सद्दाम हुसैनना फाशी सुनावणा-या न्यायाधीशाची अतिरेक्यांकडून हत्या
By admin | Published: June 24, 2014 09:45 AM2014-06-24T09:45:20+5:302014-06-24T10:02:57+5:30
इराकमधील हुकूमशहा सद्दाम हुसैन यांना फाशीची शिक्षा सुनावणा-या न्यायाधीशाची हत्या केल्याचा दावा आयएसआयएसच्या दहशतवाद्यांनी केला आहे.
Next
>ऑनलाइन टीम
बगदाद, दि. २४ - इराकमधील हुकूमशहा सद्दाम हुसैन यांना फाशीची शिक्षा सुनावणा-या न्यायाधीशाची हत्या केल्याचा दावा 'इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया'च्या ( आयएसआयएस ) दहशतवाद्यांनी केला आहे. रौफ अब्दुल रहमान असे त्या न्यायाधीशांचे नाव असून दहशतवाद्यांनी गेल्या आठवड्यात त्यांचे अपहरण करून त्यांना ठार मारल्याचे वृत्त आहे. सरकारने मात्र या वृत्ताला दुजोरा दिला नसला तरीही रहमान यांचे अपहरण झाल्याचे वृत्त मात्र फेटळाले नाही. आयएसआयएसच्या अतिरेक्यांनी १६ जून रोजी रहमान यांचे अपहरण केले व त्यानंतर दोन दिवसांनी त्यांची हत्या करण्यात आली अशी माहिती मिळत आहे.
इराकचे हुकुमशहा सद्दाम हुसैन यांच्यावर महाभियोग चालवणा-या लवादाचे रहमान हे अध्यक्ष होते. सद्दाम यांना ३० डिसेंबर, २००६ साली फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती.
दरम्यान, जॉर्डनचे खासदार खलील अट्टीह यांनी रहमान यांना ठार मारण्यात आल्याचे वृत्त फेसबुकवरुन दिले आहे. रेहमान यांना यापूर्वीही ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, मात्र तेव्हा ते निसटून जाण्यात यशस्वी ठरले होते. यावेळी मात्र त्यांचा जीव वाचू शकला नाही