सद्दाम यांचे हाल पाहूनच अणुचाचणी - उ.कोरिया
By Admin | Published: January 10, 2016 02:02 AM2016-01-10T02:02:37+5:302016-01-10T02:02:37+5:30
इराकमध्ये सद्दाम हुसैन आणि लिबियात मोहम्मद गद्दाफी यांचे झालेले हाल पाहूनच स्वसंरक्षणासाठी आपण अणुचाचणी केली, असे उत्तर कोरियाने स्पष्ट केले.
सेऊल : इराकमध्ये सद्दाम हुसैन आणि लिबियात मोहम्मद गद्दाफी यांचे झालेले हाल पाहूनच स्वसंरक्षणासाठी आपण अणुचाचणी केली, असे उत्तर कोरियाने स्पष्ट केले.
पाणबुडीवरून डागण्यात आलेल्या क्षेपणास्त्र चाचणीचे टीव्ही फुटेज दाखविताना काही दिवसांपूर्वी केलेल्या अणुचाचणीचा उल्लेख करण्यात आला. त्यात अणुचाचणीचा बचाव करताना सद्दाम हुसैन आणि गद्दाफी यांचा उल्लेख करण्यात आला. शुक्रवारी रात्री सरकारी वृत्तसंस्था केसीएनएवर प्रकाशित टिपणीवर म्हटले आहे की, या दोन नेत्यांनी त्यांचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम सोडून दिल्याने त्यांचे काय झाले हे जगाने पाहिले आहे. अणुचाचणीमुळे अमेरिकेसह अन्य शत्रू राष्ट्रांपासून रक्षण करण्याची शक्ती प्राप्त झाली आहे. स्वत:जवळ अण्वस्त्र शक्ती असेल तर बाहेरील शक्ती आक्रमण करीत नाहीत, असा इतिहास सांगतो.
केवळ अण्वस्त्रांचा त्याग केल्यामुळेच इराकमध्ये सद्दाम हुसैन आणि लिबियात गद्दाफी त्यांची राजवट सांभाळू शकले नाहीत, असेही त्यात स्पष्ट करण्यात आले आहे. (वृत्तसंस्था)
दक्षिण कोरियाला धमकी
अणुचाचणीनंतर दक्षिण कोरिया आपल्याविरुद्ध दुष्प्रचार करीत असून, सीमेवर तणाव निर्माण करीत आहे, असा आरोप करीत उत्तर कोरियाने दक्षिण कोरियाला युद्धाची धमकी दिली आहे.
दक्षिण कोरियाची प्रसारमाध्यमे कथितरीत्या विखारी प्रचार करीत आहेत. त्यातून सीमावर्ती भागात घबराट निर्माण झाली आहे. ही स्थिती युद्धजन्य असल्याचे उत्तर कोरियाने म्हटले आहे.
अणवस्रे वाहून नेणारी लढाऊ विमाने अमेरिका, द.कोरियात तैनात करणार असल्याचे वृत्त आहे. हे युद्धजन्य परिस्थिती निर्माण करण्याची चिन्हे आहेत.