इस्लामिक स्टेटला चालना देणारा सद्दामच्या इराकवरील हल्ला चूक होती - टोनी ब्लेअरनी मागितली माफी
By admin | Published: October 26, 2015 03:52 PM2015-10-26T15:52:26+5:302015-10-26T15:52:26+5:30
इराकवरील हल्ला ही चूक होती त्यामुळे इस्लामिक स्टेटच्या वाढीला चालना मिळाल्याचे इंग्लंडचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांनी मान्य केले असून त्याबद्दल दिलगिरीही व्यक्त केली आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. २६ - इराकवरील हल्ला ही चूक होती त्यामुळे इस्लामिक स्टेटच्या वाढीला चालना मिळाल्याचे इंग्लंडचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांनी मान्य केले असून त्याबद्दल दिलगिरीही व्यक्त केली आहे. सीएनएन ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सद्दाम हुसेनच्या इराकवर हल्ला करताना गुपत्चर विभागाने दिलेली माहिती चुकीची असल्याची कबुली ब्लेअर यांनी दिली आहे.
गुप्तचर विभागाची चुकीची माहिती, इराकमधल्या हल्ल्याच्या योजनेतल्या त्रुटी आणि सद्दामला हटवल्यानंतर इराकची स्थिती काय असेल, याचा अंदाज बांधण्यात आलेले अपयश या सगळ्याबद्दल टोनी ब्लेअरनी माफी मागितली आहे. अर्थात, सद्दाम हुसेनची राजवट संपुष्टात आणणे योग्यच होते यावर ब्लेअर ठाम आहेत.
सद्दाम हुसेनने सामूहिक शिरकाणाची अस्त्रे दडवल्याचा पाश्चात्य गुप्तचरांचे म्हणणे होते आणि २००३मध्ये कारवाई सुरू करण्यात आली. त्यानंतर जवळपास पाच लाख लोकांनी प्राण गमावले आणि इराकला यादवीनं ग्रासलं. तालिबान, अल कायदा आणि अखेर इस्लामिक स्टेटचा उदय झाला व आजच्या घडीला सीरिया व इराकमधल्या मोठ्या भागावर अत्यंत खतरनाक अशा इस्लामिक स्टेटचा अमल आहे.
येत्या काही दिवसांमध्ये चिलकोट समितीचा इराक हल्ल्यासंदर्भात अहवाल प्रसिद्ध होणार असून त्याआधी ब्लेअर यांनी दिलेली कबुली सूचक आहे. याआधी २००७ मध्ये त्यांच्यावर झालेल्या प्रचंड टीकेनंतरही ब्लेअर यांनी माफी मागावी असं काही आम्ही इराकमध्ये केल्याचं मला वाटत नाही असं ठामपणे सांगितलं होतं. परंतु सत्ता गमावल्यानंतर आणि चिलकोट समितीचा अहवाल बाहेर येण्याच्या काही दिवस आधी ब्लेअर यांचं मतपरीवर्तन झाल्याचं दिसत आहे.