सलाम मलालाला अन् सत्यार्थींना
By admin | Published: October 11, 2014 04:01 AM2014-10-11T04:01:55+5:302014-10-11T04:26:18+5:30
रेल्वेच्या प्रवासात त्याला एका बालकाच्या पाठीवर एक भलीमोठी बॅग दिसली...वीटभट्टीवर काही मुले हाताला चटके बसत असताना भर उन्हात कामे करत होती..
मानवाधिकाराचा पुरस्कार करणा-या आणि मानवी मूल्यांचा आदर करणाऱ्या जगातील प्रत्येकासाठी आनंदाची बातमी म्हणजे- ‘मलालाला नोबेल!’ आपल्या वयाच्या मुलींना शिक्षणाचा हक्क मिळावा, यासाठी आपले बालपण विसरून चिमुकल्या मुठी आवळून लढा देणाऱ्या मलाला युसुफजाई हिच्या कार्याची अखेर ‘नोबेल’ने दखल घेतली आहे. मागच्या वर्षी या पुरस्काराने तिला हुलकावणी दिली होती. पाकिस्तानमधील स्वात खोऱ्यातील ही मुलगी आता फक्त सतरा वर्षांची आहे. नऊ-दहा वर्षांची असल्यापासून तिचा हा लढा सुरू आहे. तालिबानी दहशतवाद्यांनी सीमेवरील स्वात खोऱ्यात आपले बस्तान बसवले. धार्मिक संदेश देता देताच त्यांनी मुलींच्या शिक्षणावर बंदी आणली. स्त्रिया आणि मुलींना बाजारपेठेत जाण्यावर बंधने घातली. याविरोधात एकटी मलाला उभी ठाकली. अर्थात तिच्या आई-वडिलांनी घालून दिलेल्या संस्कारांचा यात मोठा वाटा होता. शाळा ओस पडत होत्या. लहान मुलांच्या भाषेत सांगायचे तर शाळांना सुट्या लागल्या होत्या. खरं तर सुट्या म्हणजे मुलांसाठी आनंदाची पर्वणी असते. पण या सुट्या आनंद देणाऱ्या नव्हत्या. शाळा पुन्हा केव्हा सुरू होतील, हे शिक्षकांनाही ठाऊक नव्हते. पुन्हा आपण शाळेत जाऊ की नाही, या भीतीने मलालाच्या मनात घर केले होते. मलालाने तालिबानींच्या फतव्याविरोधात आवाज उठवला. ती घरोघरी जाऊन मुलींना शिक्षणाचे महत्त्व पटवून देऊ लागली. मुलींचे मन वळवू लागली. तिने याच काळात ‘बीबीसी’च्या संकेतस्थळावर उर्दूतून डायरी लिहायला सुरुवात केली. तब्बल ३८ वेळा तिने स्वात खोऱ्यातील अनुभव मांडून तालिबानींचा खरा चेहरा जगासमोर आणला. यासाठी तिने ‘गुलमकई’ हे टोपणनाव धारण केले. तिने मुलींच्या शिक्षणासाठी ‘मलाला फाउंडेशन’ची स्थापना केली. अँजेलिना जोलीसारख्या काही मान्यवरांनी तिला मदतीचा हात पुढे केला. प्रसारमाध्यमांनीही तिच्या कार्याची दखल घेतली.
तिला आणि तिच्या वडिलांना तालिबानींच्या धमक्या येऊ लागल्या; पण ती डगमगली नाही. ती म्हणायची, ‘तालिबानींना ठाऊकच नाही, की पुस्तकात काय लिहिले आहे; नाही तर त्यांनी शाळा बंद केल्या नसत्या.’ दोन वर्षांपूर्वी म्हणजे ९ आॅक्टोबर २०१२ रोजी ती शाळेतून परत येत असताना तालिबानींनी तिच्या डोक्यात गोळ्या घातल्या. इच्छाशक्तीच्या बळावर आणि डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे तिचा पुनर्जन्म झाला. ती नव्या उत्साहाने उभी राहिली. ध्येयापासून जराही ढळली नाही. ती अधिकच धैर्यवान आणि धाडसी झाली. शांततेसाठी जाहीर झालेला नोबेल पुरस्कार
हा तिच्या याच कार्याला केलेला सलाम होय.
रेल्वेच्या प्रवासात त्याला एका बालकाच्या पाठीवर एक भलीमोठी बॅग दिसली...वीटभट्टीवर काही मुले हाताला चटके बसत असताना भर उन्हात कामे करत होती...भल्यामोठ्या इमारतीचे मजले चढून मुले डोक्यावर बांधकामाचे साहित्य उचलून नेत होती.. भोपाळच्या विषारी वायू घटनेत कोवळ््या जिवांचे झालेले हाल आणि त्यानंतर एका स्मशानात मुले लाकडे उचलताना त्याने पाहिले आणि क्षणभराचाही विराम न घेता त्याने नोकरीचा राजीनामा दिला.
२४ वर्षांपूर्वीचा हा प्रसंग, त्याच्या मनावर कोरला..आणि चिकाटी, अपार कष्टाच्या तयारीच्या जोरावर एक सत्य प्रत्यक्षात आले. जगाने त्याच्या कष्टाचे चिज केले. कैलाश सत्यार्थी त्याचे नाव. वयाने आता साठीत प्रवेश केला असला तरी धडपड विशीच्या युवकाला मागे टाकेल अशी. एरवी लहान बालकांच्या उत्कर्षासाठी त्याहीपेक्षा बालमजुरीच्या व्याधीने गंज धरलेल्या समाजाला तो जागल्याचे काम करतो, हीच त्याची ओळख असे. सरकारशी त्याचा संघर्ष कायम ठरलेला. बालमजुरीच्या नायनाटासाठी सरकारविरूद्ध तब्बल ४० याचिका त्याने देशभरातील न्यायालयांत दाखल केल्या आहेत. मुलांमधील कौशल्य तो शोधून त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी नेहमी आग्रही असतो. त्यांच्यासाठी योजना शोधतो, मुलांवर जबरदस्ती करणाऱ्यांना धडा मिळावा म्हणून जनतेला एकत्रित करतो. आजचा दिवस उजाडला आणि या नावाने जगावर नाव कोरले. शांततेसाठी दिले जाणारे नोबेल त्यांना जाहीर झाले आणि ३४ वर्षांपासूनच्या त्यांच्या चळवळीला यशाची लखलखती किनार लाभली.
विदिशाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून त्यांनी पदवी प्राप्त केली. प्रारंभी सरकारी व नंतर एका मोठ्या खासगी कंपनीत त्यांनी नोकरी केली. दौरे करत असताना त्यांना पालकांचे छत्र नसलेल्या बालकांच्या चेहऱ्यावरील लोपलेले हास्य गलबलून टाकत असे. नोकरीत असूनही त्यांनी त्याविरूद्ध लढा उभारला. पण समाधान मिळत नव्हते. पुढे राजीनामा देऊन बालकांच्या हक्कासाठी चळवळ उभारायचे ठरविले. त्यांनी काहींना याबाबत सांगितले. काहींना मदत केली, तर अनेकांनी मुलांपेक्षा इतरही प्रश्न आपल्यापुढे आहेत, असे सांगून त्यांचा हिरमोडही केला. पहिली सात वर्षे त्यांना मार्ग सापडत नव्हता. पण मुलांच्या हितासाठी पोलीसांपासून बाल्यगृहापर्यंतचे लढे सुरूच होते. ९०मध्ये ‘बचपन बचाओ आंदोलन’नावाने चळवळ सुरू केली. रेल्वेस्टेशन ते वीटभट्टी एवढेच नव्हें तर वेश्यावस्तीतील आयुष्य कोमेजलेल्या लहानग्यांना वस्तीजवळील शाळेत दाखल केले. प्रत्येकाच्या वहीवर एक वाक्य होते, मी तुझा मित्र आहे. आणि त्याखाली एका गाण्याचे बोल
लिहून होते,‘नन्हे मुन्ने बच्चे तेरे मुठ्टी में क्या है...’