कर्मचाऱ्यांचा पगार वाढवला, सरकारने मालकाला थेट तुरुंगात पाठवला, कारण वाचून बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2024 08:40 PM2024-07-04T20:40:05+5:302024-07-04T20:40:30+5:30

Myanmar News: आपल्याकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार हा मालक वर्गाकडून ठरावीक काळाने वाढवला जातो. काही ठिकाणी कमी तर काही ठिकाणी जास्त पगारवाढ होते. मात्र म्यानमारमध्ये काही दुकानमालकांनी कर्मचाऱ्यांचा पगार वाढवल्याने सरकारने त्यांची थेट तुरुंगात रवानगी केली.

Salaries of the employees were increased, the Myanmar government sent the owner straight to jail, as the reading would be shocking | कर्मचाऱ्यांचा पगार वाढवला, सरकारने मालकाला थेट तुरुंगात पाठवला, कारण वाचून बसेल धक्का

कर्मचाऱ्यांचा पगार वाढवला, सरकारने मालकाला थेट तुरुंगात पाठवला, कारण वाचून बसेल धक्का

आपल्याकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार हा मालक वर्गाकडून ठरावीक काळाने वाढवला जातो. काही ठिकाणी कमी तर काही ठिकाणी जास्त पगारवाढ होते. मात्र म्यानमारमध्ये काही दुकानमालकांनी कर्मचाऱ्यांचा पगार वाढवल्याने सरकारने त्यांची थेट तुरुंगात रवानगी केली. तसेच कर्मचाऱ्यांना वाढीव पगार देण्याची ऑफर देत असलेल्या मालकांचा शोध घेण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. आता तुम्ही म्हणाल की, म्यानमारमध्ये पगारवाढ करणं बेकायदेशीर असेल, मात्र तसंही नाही आहे. मात्र एक कारण असं आहे ज्यामुळे सरकार त्रस्त आहे. त्यामधूनच ही कारवाई केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार म्यानमारमधील मंडाले येथील प्याए फ्यो जो हे तीन दुकानांचे मालक आहेत. ते मोबाईल फोन विक्रीचा व्यवसाय करतात. यावर्षी चांगली कमाई झाल्याने त्यांनी कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये वाढ केली. कर्मचारी खूश झाले. मात्र म्यानमारच्या सैन्याला हे आवडलं नाही. त्यांनी प्या फ्यो जो यांना अटक केली. तसेच त्यांच्या दुकानांनाही ताळे ठोकले.  प्या फ्यो जो यांच्या प्रमाणेच देशातील इतर किमान १० दुकानदारांनाही तुरुंगात टाकण्यात आले आहे. त्यांनीही कर्मचाऱ्यांचं वेतन वाढवल्याचं वृत्त पसरलं होतं.  

प्या फ्यो जो यांच्या दुकानात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने सांगितलं की, आम्ही पगार वाढल्याने खूप आनंदित झालो होतो. मात्र आता आमचं दुकान बंद करण्यात आलं आहे. आता आम्हाला पगार मिळत नाही आहे. त्यामुळे आम्ही खूप निराश झालो आहोत, अशी व्यथा त्याने मांडली.

दरम्यान, म्यानमारमध्ये पगार वाढवल्यामुळे कठोर कारवाई करण्याचं कारण म्हणजे २०२१ मध्ये लष्कराने सत्ता सांभाळल्यापासून म्यानमार आर्थिक संकटाचा सामना करत आहे. विविध समुहाकंडून होत असलेल्या देशांतर्गत बंडामुळे व्यापार ठप्प झाला आहे. महागाई प्रचंड वाढली आहे. लोकांच्या हातात अधिकचा पैसा जात असल्याने ते अधिक खरेदी करत आहेत, त्यामुळे महागाई वाढत आहे, असा तर्क सरकारकडून दिला जात आहे. त्यामुळे लोकांच्या हातात कमी पैसा गेल्यास ते कमी खर्च करतील आणि महागाई नियंत्रणात येईल, असा सरकारचा दावा आहेत. त्यामधूनच म्यानमारमधील सत्ताधारी लष्करी सरकारकडून महागाई नियंत्रणात आणण्यासाठी असले अजब उपाय केले जात आहेत. 

Web Title: Salaries of the employees were increased, the Myanmar government sent the owner straight to jail, as the reading would be shocking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.