२० वर्षांपासून पगार चालू, काम मात्र काहीच नाही! पण ती म्हणते बिनकामाचा पगार नको

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 05:55 AM2024-06-27T05:55:21+5:302024-06-27T05:56:28+5:30

काम नाही पण पगार मात्र सुरू हे जिच्या बाबतीत घडलं तिचं नाव आहे लॉरेन्स व्हान व्यासेनहोव्ह.

Salary for 20 years, but no work But she says no salary for no work | २० वर्षांपासून पगार चालू, काम मात्र काहीच नाही! पण ती म्हणते बिनकामाचा पगार नको

२० वर्षांपासून पगार चालू, काम मात्र काहीच नाही! पण ती म्हणते बिनकामाचा पगार नको

माणसाला रिकामं बसवत नाही. त्याला काही ना काही काम हवं असतं. हाताला आणि डोक्यालाही. ते जर नसेल तर तो वैतागतो.  अर्थात, काम मिळाल्यानंतर माणूस समाधानी असतो असं मात्र नाही. कोणी मनासारखं काम मिळत नाही म्हणून वैतागलेला, कुणाची कामाच्या स्वरूपावरून नाराजी असते, कुणाला कामाचं ठिकाण आणि वेळ जिकिरीची वाटते, तर कुणाला कामं टाळायची असतात. त्यांना फक्त पगार हवा असतो... कामाबद्दलच्या अशा असंख्य तक्रारी असतात. पण तब्बल वीस वर्षे पगार तर दरमहा मिळतोय, मात्र कंपनी  कामच देत नाही अशी कुणाची तक्रार तुम्ही ऐकली आहे का? काम न करता पगार मिळणं ही बहुतेकांना चैनच वाटेल, पण ही चैन नसून आपल्यावरील अन्याय असल्याचं एका महिला कर्मचाऱ्याचं म्हणणं आहे. आपल्याला पगार मिळतो तर कामही द्यायला हवं, हा न्याय मिळण्यासाठी तिला न्यायालयाचे दरवाजे ठोठवावे लागले.

काम नाही पण पगार मात्र सुरू हे जिच्या बाबतीत घडलं तिचं नाव आहे लॉरेन्स व्हान व्यासेनहोव्ह. ती फ्रान्समधील रहिवासी आहे. ती अपंग आहे.  फ्रान्समधील मुख्य टेलिकॉम कंपन्यांपैकी जायंट ऑरेंज ही महत्त्वाची कंपनी आहे. या कंपनीत लाॅरेन्स काम करते.  तिचा तिथे वर्णभेद व इतर कारणांवरून छळ करण्यात आला, असा आरोप तिने  कंपनीवर ठेवला आहे. १९९३ मध्ये फ्रान्स टेलिकाॅमने लाॅरेन्सला नोकरीवर घेतले होते. त्याचदरम्यान ऑरेंज कंपनीने ती कंपनी ओव्हरटेक केली.  फ्रान्स टेलिकाॅमला लाॅरेन्सच्या आरोग्याची पूर्वकल्पना होती. लाॅरेन्सच्या शरीराच्या एका भागाला पक्षाघात झाला होता. शिवाय इतरही लहानमोठ्या आजारांनी लाॅरेन्स त्रस्त होती.  लाॅरेन्स ही कंपनीत सेक्रेटरी म्हणून काम करत होती. २००२ पर्यंत ती कंपनीत  मानव संसाधन विभागात कार्यरत होती. तिने बदलीसाठी अर्ज केला होता. पण बदली म्हणून मिळालेलं ठिकाण तिच्यासाठी सोयीचं नव्हतं. 

ऑरेंज कंपनीने तिचे म्हणणे अजिबात विचारात घेतले नाही. महत्त्वाचं म्हणजे कंपनी लाॅरेन्सला काम देत नव्हती, पण तिला पगार मात्र नियमित देत होती. वास्तविक बदली झाल्यानंतर लाॅरेन्सच्या कामाचं ठिकाण आणि स्वरूप बदललेलं होतं पण त्याला अनुसरून लाॅरेन्सच्या कामात मात्र काहीच बदल केले गेले नाहीत. बदललेल्या कामाची ऑर्डरदेखील तिला दिली गेली नाही. हा सर्व प्रकार म्हणजे कामावरून काढून न टाकता कर्मचाऱ्याचा मानसिक छळ करण्याचा प्रकार आहे, असं लाॅरेन्सचं ठाम मत होतं. त्याविरुद्ध गेल्या काही वर्षांपासून ती आवाज उठवते आहे, पण त्यात तिला अजूनही यश आलेलं नाही.

काम नाही आणि पगार मात्र नियमित ! तब्बल वीस वर्षे हा प्रकार सुरू असल्यानं इतरांना लाॅरेन्सची ऐश सुरू आहे असं वाटत होतं, पण ही ऐश नसून केवळ जाच आहे हे फक्त लाॅरेन्सलाच समजत होतं. तिला पगार मिळत होता पण काम दिलं जात नव्हतं. आणि तरीही ती नीट काम करत नाहीये अशा वरिष्ठांच्या नोटिसा अन् मेमो  तिच्या नावावर निघत होते. त्यालाही तिला उत्तरे द्यावी लागत होती. तिने तिच्या वरिष्ठांकडे अन् सरकारकडे याबाबत लेखी तक्रार केली. त्यानंतर ऑरेंज कंपनीने तडजोड घडवून आणण्यासाठी एका मध्यस्थाची नेमणूक केली. पण त्यानंतरही परिस्थितीत काहीच सुधारणा झाली नाही.
 
या परिस्थितीमुळे तिला नैराश्याचा त्रास होऊ लागला. त्यासाठी थेरपी, गोळ्या- औषधं आणि उपचार सुरू झाले. ऑरेंज कंपनीने मात्र लाॅरेन्सने केलेले आरोप फेटाळून लावले होते. आम्ही लाॅरेन्सला कामासाठी अनुकूल वातावरण उपलब्ध करून दिले, तिला काम करता येईल अशा सोयी उपलब्ध करुन दिल्या. लाॅरेन्स आजारपणाच्या सुटीवर मन परतून कामावर रुजू व्हायची तेव्हा तिला हवे असलेले बदल कामात आणि कामाच्या ठिकाणी करून दिले जायचे असे कंपनीचे म्हणणे होते. सुरुवातीला ऑरेंज कंपनीने तिला शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा देऊन नियुक्ती केली होती. त्यानंतर तिची शारीरिक स्थिती बघून तिला कंपनीत सचिवपद आणि सोयीसुविधा देऊ केल्या होत्या असेही स्पष्टीकरण कंपनीने दिले. पण कंपनी आपल्याला काम न देता पगार आणि मेमो देऊन छळ करते आहे, असा लाॅरेन्सचा आरोप कायम आहे.

लाॅरेन्सला काम हवंय आणि पैसाही! 
लाॅरेन्स व्यासेनहोव्ह ही दोन मुलांची आई आहे. तिचं एक मूल स्वमग्न आहे. घरचा ताण आणि कामाच्या ठिकाणी होणारा विचित्र छळ यामुळे लाॅरेन्स वैतागून गेली आहे. आपण कंटाळून नोकरी सोडून द्यावी अशीच कंपनीची इच्छा असल्याचं लाॅरेन्सचं म्हणणं आहे. पण आपल्या पैशांवर कुटुंब चालत असल्याने लाॅरेन्सने नोकरी टिकवून ठेवली होती. शिवाय तिला काम करण्याची इच्छा देखील आहे. आणि म्हणूनच हा बिनकामाचा पगार लाॅरेन्सला आता नकोसा झाला आहे.

Web Title: Salary for 20 years, but no work But she says no salary for no work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.