टाटाकडून ब्रिटनमधील एका पोलाद प्रकल्पाची विक्री
By admin | Published: April 12, 2016 02:49 AM2016-04-12T02:49:41+5:302016-04-12T02:49:41+5:30
टाटाने आर्थिक संकटात सापडलेल्या आपल्या ब्रिटिश पोलाद प्रकल्पापैकी ‘लाँग प्रॉडक्टस् युरोप’ हा प्रकल्प गुंतवणूक कंपनी ग्रेबुल कॅपिटलला विकला आहे. या सौद्याबरोबर ब्रिटनमधील आपला
लंडन : टाटाने आर्थिक संकटात सापडलेल्या आपल्या ब्रिटिश पोलाद प्रकल्पापैकी ‘लाँग प्रॉडक्टस् युरोप’ हा प्रकल्प गुंतवणूक कंपनी ग्रेबुल कॅपिटलला विकला आहे. या सौद्याबरोबर ब्रिटनमधील आपला पोलाद प्रकल्प विकण्याच्या प्रक्रियेलाही टाटाकडून रीतसर प्रारंभ करण्यात आला आहे.
टाटा स्टील युके ही उपकंपनी टाटांचा ब्रिटनमधील व्यवसाय पाहते. या कंपनीनील आपली संपूर्ण भागीदारी टाटा विकून टाकणार आहे. त्यासाठी केपीएमजी एलएलसी या कंपनीची प्रक्रिया सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. याशिवाय स्लॉटर अँड मे या कंपनीची कायदेशीर सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
एका अधिकृत निवेदनात टाटाने म्हटले की, लाँग प्रॉडक्टस् युरोप या व्यवसायाची फॅमिली इन्व्हेस्टमेंट कंपनी ग्रेबुल कॅपिटलला विक्री करण्यात आली आहे. त्यासंबंधीच्या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. हा संपूर्ण व्यवसाय ग्रेबुल ताब्यात घेईल. त्यात संपत्ती आणि देणेदारीचा समावेश आहे. काही अटींची पूर्तता झाल्यानंतर हा व्यवहार पूर्ण होईल. कराराचे हस्तांतरण, काही ठराविक सरकारी मंजुऱ्या आणि समाधानकारक आर्थिक व्यवस्था यांचा त्यात समावेश आहे.
दरम्यान, ब्रिटनमधील टाटाचे पोलाद प्रकल्प खरेदी करण्याची इच्छा प्रसिद्ध उद्योगपती संजीव गुप्ता यांनी या आधीच व्यक्त केली आहे. कंपनीच्या स्टीलच्या चार हजार कामगारांचा रोजगार वाचविण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे संजीव गुप्ता यांनी म्हटले आहे. पोर्ट टालबोट येथील हा पोलाद कारखाना ब्रिटनमधील सगळ्यात मोठा असून तो विक्रीस निघाला आहे. लिबर्टी हाऊस ग्रुपचे गुप्ता हे प्रमुख आहेत. त्यांनी टाटा स्टीलची जबाबदारी घेण्यात गोडी दाखविली आहे.
विकण्यात आलेल्या या कंपनीच्या ब्रिटनमधील प्रकल्पात ४,४00 कामगार आहेत, तसेच फ्रान्समध्ये ४00 कामगार आहेत. ३१ मार्च रोजी टाटा स्टील युरोपच्या संचालक मंडळाची बैठक झाली होती. या बैठकीत हा व्यवसाय विकून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
टाटाने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ग्रेबुल कॅपिटलसोबत संभाव्य प्रकल्प विक्रीसाठी वाटाघाटी करण्यासाठी इरादापत्रावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. लाँग प्रॉडक्टस् युरोपचे कार्यकारी चेअरमन बिमलेंद्र झा यांनी सांगितले की, हा विक्री व्यवहार कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी सर्वोत्तम पर्याय आहे, तसेच संभाव्य खरेदीदारासाठीही हा सौदा आकर्षक आहे.