सलीमा मजारींचा तालिबान्यांना चकमा, काबूलमधून अमेरिकेत पोहोचल्या सुरक्षित
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 11:02 AM2021-09-15T11:02:27+5:302021-09-15T11:03:12+5:30
salima mazari escaped from afghanistan : सलीमा मजारी यांचा तालिबानच्या हिटलिस्टमध्ये बराच काळ समावेश होता. सलीमा मजारी यांनी चाहर जिल्ह्यात बराच काळ तालिबानशी लढा दिला.
अफगाणिस्तानवरतालिबानने कब्जा मिळवल्यानंतर याठिकाणी काळजीवाहू सरकार स्थापन केले आहे. मात्र, तालिबाननेअफगाणिस्तानचा ताबा घेतला असला तरी त्यांच्यासाठी हा मार्ग सोपा नव्हता. कारण अफगाणिस्तानच्या वेगवेगळ्या ठिकाणी त्याचा सामना करण्यासाठी नेहमीच कोणीतरी तयार होते. यापैकी एक होत्या, त्या म्हणजे अफगाणिस्तानातील एका प्रांताची महिला राज्यपाल सलीमा मजारी.
सलीमा मजारी यांना तालिबान्यांनी पकडल्याची बातमी मध्यंतरी आली होती, नंतर त्यांच्या मृत्यूच्या अफवाही पसरल्या होत्या. पण, या सर्व अटकळांपासून दूर सलीमा मजारी या पूर्णपणे सुरक्षित आहेत. 39 वर्षीय सलीमा मजारी सध्या अमेरिकेत सुरक्षित ठिकाणी आहेत, ज्या तालिबानवर मात करून अमेरिकेत यशस्वीरित्या पोहोचल्या आहेत. सलीमा मजारी यांचा तालिबानच्या हिटलिस्टमध्ये बराच काळ समावेश होता. सलीमा मजारी यांनी चाहर जिल्ह्यात बराच काळ तालिबानशी लढा दिला.
अफगाणिस्तानमधून कशा बाहेर पडल्या सलीमा?
अमेरिकेतील टाइम मासिकाला दिलेल्या मुलाखतीत सलीमा मजारी यांनी सांगितले आहे की, तालिबानने चारकिंत जिल्ह्यात 30 पेक्षा जास्त वेळा हल्ले केले होते, पण ते यशस्वी होऊ शकले नाहीत. मात्र, काही काळानंतर तालिबान्यांनी काबूल आणि मजार-ए-शरीफ काबीज केले. 2018 मध्ये सलीमा मजारी या क्षेत्राच्या राज्यपाल झाल्या, त्या सुरुवातीपासून सरकारच्या समर्थक होत्या आणि त्यांनी तालिबानचा विरोध सुरूच ठेवला. तालिबान्यांनी त्याच्यावर अनेक वेळा हल्ला केला, पण त्यांनी तालिबानशी लढा दिला आणि गरज पडल्यावर बंदूक उचलली होती.
जेव्हा तालिबानने मजार-ए-शरीफ काबीज केले आणि ते चारकिंतच्या दिशेने जाऊ लागले. तेव्हा सलीमा मजारी आपल्या समर्थकांसह उझबेकिस्तानच्या सीमेवर पोहोचल्या, जेणेकरून त्या निघून जाता येईल, पण त्यांना सीमेबाहेर पडण्यात यश आले नाही. यानंतर त्या काही ठिकाणी थांबल्या आणि अडचणींचा सामना करत काबूलच्या विमानतळावर पोहोचल्या.
या दरम्यान, सलीमा जाफरी यांना काबूल विमानतळाकडे जाताना तालिबानी दिसले. मात्र, त्या तालिबान्यांना चकमा देऊन पळून जाण्यात यशस्वी झाल्या. शेवटी 25 ऑगस्ट रोजी सलीमा जाफरी काबूल सोडण्यात यशस्वी झाली, येथून त्या अमेरिकन सैन्याच्या फ्लाइटमध्ये कतारला पोहोचल्या आणि त्यानंतर त्या आता अमेरिकेत सुरक्षित ठिकाणी आहे. दरम्यान, सलीमा मजारी म्हणतात की, त्यांचा तालिबानविरुद्धचा लढा अजूनही सुरू आहे.