सलमान रश्दी यांच्या यकृताला दुखापत, व्हेंटिलेटरवर ठेवले, डाेळाही धाेक्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2022 06:12 AM2022-08-14T06:12:33+5:302022-08-14T06:12:59+5:30
Salman Rushdie : न्यूयॉर्क येथे एका व्याख्यानाच्या कार्यक्रमात सलमान रश्दी यांच्यावर हादी मतार या हल्लेखोराने धारदार शस्त्राने १५ हून अधिक वार केले.
न्यूयॉर्क : दि सॅटनिक व्हर्सेस या वादग्रस्त पुस्तकाचे लेखक सलमान रश्दी (वय ७५) यांच्यावर शुक्रवारी झालेल्या जीवघेण्या हल्ल्यामुळे ते एक डोळा गमाविण्याची शक्यता आहे. तसेच त्यांच्या यकृतालाही दुखापत झाली आहे. पेनसिल्वानिया येथील एका रुग्णालयामध्ये रश्दी यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून, त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवले आहे.
न्यूयॉर्क येथे एका व्याख्यानाच्या कार्यक्रमात सलमान रश्दी यांच्यावर हादी मतार या हल्लेखोराने धारदार शस्त्राने १५ हून अधिक वार केले. त्यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना हवाई रुग्णवाहिकेने तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. रश्दी यांच्यावरील हल्ला भयानक व निंदनीय आहे, अशी प्रतिक्रिया अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन यांनी व्यक्त केली आहे. हल्लेखोराने धारदार शस्त्राने वार केल्याने रश्दी यांच्या यकृताला दुखापत झाली आहे.
हादी मतार (२४) हा हल्लेखोर न्यू जर्सी येथील फेअर व्ह्यू भागातील रहिवासी आहे. त्याला लगेचच अटक करण्यात आली. इराणच्या इस्लामिक रेव्होल्युशरी गार्ड कॉर्प्सच्या ध्येय-धोरणांविषयी हादी याला आस्था आहे. (वृत्तसंस्था)
हल्लेखोर खोमेनींच्या विचारांचा समर्थक?
सलमान रश्दी यांनी दि सॅटनिक व्हर्सेस हे पुस्तक लिहिल्यानंतर इराणचे तत्कालीन प्रमुख आयातुल्ला खोमेनी यांनी त्यांच्याविरोधात मृत्युदंडाचा फतवा १९८९ मध्ये जारी केला होता. तेव्हापासून रश्दी यांच्यावर हल्ल्याचे संकट घोंगावत होते. रश्दी यांच्यावर हल्ला करणारा हादी मतार खोमेनी यांच्या विचारांचा समर्थक असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
‘सॅटनिक’वर बंदीचा निर्णय योग्य : सिंह
कायदा व सुव्यवस्थेच्या कारणांपायी देशाचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी सलमान रश्दी यांच्या दि सॅटनिक व्हर्सेस या पुस्तकावर १९८८ मध्ये बंदी घातली होती. हा निर्णय योग्य होता, असे तत्कालीन परराष्ट्रमंत्री के. नटवर सिंह यांनी म्हटले आहे.
या पुस्तकाविषयी लोकांच्या भावना अतिशय तीव्र आहेत. त्यामुळे बंदी घालणे योग्य ठरेल, असे के. नटवरसिंह यांनी राजीव गांधी यांना सांगितले होते.