Salman Rushdie: सलमान रश्दींचा एक डोळा, हात निकामी; हल्ल्यानंतर एजंटने दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2022 09:26 AM2022-10-24T09:26:59+5:302022-10-24T09:27:09+5:30
ऑगस्टमध्ये एका साहित्यिक कार्यक्रमात सलमान रश्दी यांच्यावर हल्ला झाला होता, त्यात ते गंभीर जखमी झाले होते.
न्यूयॉर्कमध्ये ऑगस्ट महिन्यात प्रसिद्ध लेखक सलमान रश्दींवर हल्ला झाला होता. एका सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांच्यावर जिवघेणा हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात त्यांचा डोळा आणि हात निकामी झाला आहे. दोन महिन्यांपूर्वी रश्दी किती जखमी झालेले याची माहिती त्यांच्या एजंटने दिली आहे.
सलमान रश्दींचा एजंट अँड्र्यू विली याने स्पॅनिश वृत्तपत्र El País ला मुलाखत दिली. सलमान रश्दी यांच्या जखमा खोल असल्याचे तो म्हणाला. मानेवर तीन गंभीर जखमा आहेत. एका डोळ्याची दृष्टी गेली आहे. त्यांच्या एका हाताचीही हालचाल करणे बंद झाले आहे. हाताच्या नसा कापल्या गेल्यामुळे एक हात काम करत नाहीय. रश्दी यांच्या छातीत आणि शरीरावर जवळपास १५ ठिकाणी जखमा आहेत, असे तो म्हणाला.
सलमान रश्दी दोन महिन्यांहून अधिक काळ रुग्णालयात दाखल होते का, यावर त्याने काहीही भाष्य केलेले नाही. ऑगस्टमध्ये एका साहित्यिक कार्यक्रमात सलमान रश्दी यांच्यावर हल्ला झाला होता, त्यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. या हल्ल्यात त्यांच्या हाताला, छातीला आणि डोळ्याला गंभीर दुखापत झाली. 80 च्या दशकात इराणच्या सर्वोच्च नेत्याने 75 वर्षीय सलमान रश्दी यांच्या विरोधात फतवा काढला होता. याच्या ३३ वर्षांनी रश्दींवर प्राणघातक हल्ला झाला आहे.
सलमान रश्दी यांच्या कादंबरीत कथितरित्या प्रेषित मोहम्मद यांच्या निंदेचा संदर्भ आहे. सलमान रश्दी यांचा जन्म भारतातील एका काश्मिरी मुस्लिम कुटुंबात झाला होता.