९९ वर्षांच्या आईदेखत ७२ व्या वर्षी पदवी!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2023 09:26 AM2023-11-06T09:26:05+5:302023-11-06T09:30:35+5:30

अगदी जगावर एका अर्थी राज्य करणाऱ्या अमेरिकेतदेखील कॉलेजमध्ये प्रवेश घेणं हे काही सोपं नाही. अनेक लोकांना शालेय शिक्षण संपलं की, परिस्थितीमुळे नोकरीधंद्याची वाट धरावी लागते.

Sam Kaplan, 72, graduates from a Georgia college with his 99-year-old mom cheering him on | ९९ वर्षांच्या आईदेखत ७२ व्या वर्षी पदवी!

९९ वर्षांच्या आईदेखत ७२ व्या वर्षी पदवी!

शाळेतून पास आउट झालं की, कॉलेजमध्ये जायचं हे काही नशीबवान लोकांनी गृहीत धरलेलं असतं. त्यांना शाळा शिकतानाही कधी अडचणींना तोंड द्यावं लागत नाही आणि कॉलेजमध्ये जाणं हेही त्यांच्यासाठी काही विशेष नसतं. कॉलेज पूर्ण करून पदवी घेतली की मग पुढच्या आयुष्याचा विचार करू, इतकं त्यांच्यासाठी साधं सोपं गणित असतं. मात्र काही लोकांसाठी आयुष्य इतकं सोपं नसतं. अनेक लोक जेमतेम शालेय शिक्षण पूर्ण करतात. पण कॉलेजमध्ये जाणं हे त्यांच्यासाठी एक स्वप्नच असतं. इतकंच नाही, तर अनेक लोक हे स्वप्न सुद्धा बघू शकत नाहीत. ही परिस्थिती जगातल्या सगळ्या देशांमध्ये असते. अगदी जगावर एका अर्थी राज्य करणाऱ्या अमेरिकेतदेखील कॉलेजमध्ये प्रवेश घेणं हे काही सोपं नाही. अनेक लोकांना शालेय शिक्षण संपलं की, परिस्थितीमुळे नोकरीधंद्याची वाट धरावी लागते.

अमेरिकेतल्या जॉर्जिया राज्यातील सॅम कॅप्लान यांच्याही बाबतीत असंच काहीसं झालं. त्यांनी १९६९ साली शालेय शिक्षण पूर्ण केलं, पण महाविद्यालयात प्रवेश घेण्याचा मात्र विचारदेखील त्यांनी केला नाही. कारण शाळा संपल्यावर पोटापाण्याच्या उद्योगाला लागणं हीच त्यांची प्राथमिकता होती. त्यांनी शाळेतून बाहेर पडल्यावर विविध वस्तू आणि कपडे स्वच्छ करून देण्याचं काम केलं. एका इलेक्ट्रॉनिक मालाच्या होलसेल डिस्ट्रिब्युटरकडे ग्राहक सेवा विभागात काम केलं. इतकंच नाही, तर पार्ट टाईम टॅक्सीसुद्धा चालवली. आणि ही टॅक्सी चालविण्याचं काम करत असताना त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.

सॅम कॅप्लान टॅक्सी चालवत असताना त्यांनी आकाशवाणीवर ऐकलं की, जॉर्जिया ग्वेनेट कॉलेज स्क्रिप्ट रायटिंग या विषयात डिग्री देणाऱ्या अभ्यासक्रमाची घोषणा करत आहे. ते म्हणतात, 'ही बातमी ऐकताना माझी टॅक्सी जणू काही ऑटो पायलट मोडवर गेली. मी जीव ओतून ती बातमी ऐकत होतो. त्यानंतर माझं मला काही समजायच्या आत मी त्या कोर्सला अॅडमिशन घेतलेली होती!"

कॉलेजचं शिक्षण पूर्ण करण्याचं स्वप्न त्यांनीही लहान वयात बघितलेलं असेल. ते पूर्ण करण्याच्या दृष्टीने उचललेलं हे पहिलं पाऊल होतं. पण शिक्षण सोडून जवळजवळ पन्नास वर्षं झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा कॉलेजला प्रवेश घेऊन अभ्यास करणं फार सोपं नव्हतं. सॅम कॅप्लान म्हणतात, "विद्यार्थी दशेत ज्या गोष्टी आपण सहज करतो, ज्या प्रत्येकाला येतात अशा बहुतेक सगळ्या गोष्टी मी विसरून गेलो होतो. मला अभ्यास कसा करायचा ते आठवत नव्हतं. नोट्स कशा काढायच्या ते लक्षात येत नव्हतं. इतकंच नाही, तर नवीन मित्रमैत्रिणी कशा करायच्या हेही मला आठवेना. साधं वर्गातल्या मुलांशी बोलून मला त्यांच्याशी मैत्री देखील करता येईना."

पण एकदा प्रवेश घेतला म्हटल्यावर तो अभ्यासक्रम पूर्ण करून काहीही करून पदवी घ्यायची हे मात्र त्यांचं ठरलेलं होतं. त्यासाठी जे करावं लागेल ते करण्याची त्यांची तयारी होती. अखेरीस हिय्या करून त्यांनी त्यांच्या वर्गातील त्यांच्यापेक्षा ५० वर्षांनी लहान असणाऱ्या विद्यार्थ्याला अभ्यास करण्याच्या टिप्स विचारल्या. त्या संभाषणाने त्यांच्यासाठी अनेक प्रश्न सोपे केले. आपल्या वर्गातील हा सहकारी जरी वयाने खूप ज्येष्ठ असेल, तरी तो आपल्यासारखाच विद्यार्थी आहे. त्यालाही आपल्यासारख्याच अडचणी येतात, हे लक्षात आल्यावर विद्यार्थ्यांनी त्यांना सर्वतोपरी सहकार्य केलं. त्यांच्या शिक्षकांनीही त्यांना मदत केली. गरज लागेल तसं मार्गदर्शन केलं. इतकंच नाही तर सॅम यांच्या पाच मुलांनीही त्यांना अभ्यास करायला मदत केली.

या सगळ्यांच्या मार्गदर्शनाने आणि त्याहीपेक्षा स्वतःच्या मेहनतीने आणि जिद्दीने सॅम कॅप्लान यांनी वयाच्या ७२ व्या वर्षी जॉर्जिया वेनेत कॉलेजमधून सिनेमा अँड मीडिया आर्ट्स या विषयातून डिग्री मिळवली. सॅम यांना एकूण ७ भावंडं आहेत. मात्र कॉलेजचं शिक्षण पूर्ण करून त्यातील पदवी घेणारे त्यांच्यातील सॅम हे पहिलेच आहेत. ही डिग्री घेण्यासाठी सॅम ज्यावेळी व्यासपीठावर गेले, त्यावेळी समोर प्रेक्षकांमध्ये इतर विद्यार्थ्यांसारखीच त्यांचीही आई बसलेली होती. केवळ ९९ वर्ष वय असलेली ही आई आपल्या ७२ वर्षांच्या मुलाचं ग्रॅज्युएट होण्याचं स्वप्न डोळे भरून पाहत होती.

'आता त्यांची आठवण येईल!'
सॅम कॅप्लान यांना शिकविणाऱ्या असोसिएट प्रोफेसर केट बेलस्ले म्हणतात, "मी सॅम यांना अनेक वर्गामध्ये शिकवलं. ते त्यांच्या आजवरच्या रोमांचक आयुष्याचे अनुभव आणि स्वतःच्या कुटुंबाबद्दल कायमच आनंदाने माहिती शेअर करायचे. त्यांना पदवी मिळाली याचा आम्हाला सगळ्यांनाच फार आनंद झाला आहे. मात्र आम्हाला त्यांची फार आठवण येईल."
 

Web Title: Sam Kaplan, 72, graduates from a Georgia college with his 99-year-old mom cheering him on

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.