आता थायलंडमध्ये समलिंगी जोडप्यांना लग्न करता येणार, सरकारने कायदा केला; मूल दत्तक घेण्याचा आणि वारसा हक्क मिळाला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 12:01 PM2024-09-26T12:01:39+5:302024-09-26T12:05:49+5:30
थायलंडमध्ये ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. प्रदीर्घ लढ्यानंतर अखेर थायलंडमध्ये समलैंगिकता कायद्याला कायदेशीर मान्यता मिळाली. आता समलिंगी जोडप्यांना त्यांच्या विवाहाची नोंदणी करता येणार आहे.
थायलंडमध्ये एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. थायलंडमध्ये आता समलिंगी जोडपे लग्न करू शकणार आहेत. राजा महा वजिरालॉन्गकोर्न यांनी मंगळवारी मंजुरी दिल्यानंतर आता समलिंगी विवाह कायदा कायदा बनला आहे. हा कायदा पुढील वर्षी म्हणजेच २२ जानेवारी २०२५ पासून देशात लागू होईल.
कायद्याच्या अंमलबजावणीनंतर देशातील कोणतेही समलिंगी जोडपे कायदेशीररित्या त्यांच्या विवाहाची नोंदणी करू शकतात. थायलंड आता समलिंगी विवाहाला मान्यता देणारा आशियातील तिसरा आणि आग्नेय आशियातील पहिला देश बनला आहे.
चीनच्या महाकाय धरणामुळे पृथ्वीचे परिभ्रमण मंद गतीने होतंय?; जगावर परिणाम होणार, नासाने सांगितले
एप्रिलमध्ये थायलंडच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये आणि जूनमध्ये सिनेटमध्ये हे विधेयक मंजूर करण्यात आले. आता राजाच्या मान्यतेनंतर त्याला कायद्याचे स्वरूप आले आहे. कायद्यात समलिंगी विवाहाला मान्यता आणि आर्थिक आणि वैद्यकीय अधिकार प्रदान करण्याची तरतूद आहे. समलिंगी जोडपी मुले दत्तक घेऊ शकतील. त्यांना वारसा हक्कही मिळाला आहे. आता कागदपत्रांमध्ये स्त्री-पुरुष आणि पती-पत्नीऐवजी लिंगभावाऐवजी जेंडर न्यूट्रल शब्द वापरण्यात येणार आहेत.
नेदरलँड्ने २०२१ मध्ये पहिल्यांदा समलिंगी विवाहाला मान्यता दिली. सध्या जगातील ३० हून अधिक देशांमध्ये समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता आहे. थायलंड तैवान आणि नेपाळनंतर असा कायदा करणारा तिसरा देश बनला आहे. कायदा लागू झाल्याने थायलंडमध्ये समलैंगिक विवाहाची मागणी करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाची लाट आहे.
२२ जानेवारीपासून थायलंडमध्ये हा कायदा लागू होणार आहे. एकाच दिवशी हजाराहून अधिक समलिंगी जोडप्यांचे सामूहिक विवाह करण्याचीही तयारी सुरू आहे. हा कार्यक्रम बँकॉक येथे होणार आहे.