कामगारांना कॅन्सर झाल्याबद्दल सॅमसंगने अखेर मागितली माफी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2018 02:13 AM2018-11-24T02:13:16+5:302018-11-24T02:13:28+5:30
आपल्या काही कारखान्यांत काम केल्यामुळे काही कामगारांना कॅन्सर झाल्याबद्दल सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सने अखेर माफी मागून भरपाई देण्याचे मान्य केल्याने दशकभराच्या वादावर पडदा पडला.
सेऊल : आपल्या काही कारखान्यांत काम केल्यामुळे काही कामगारांना कॅन्सर झाल्याबद्दल सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सने अखेर माफी मागून भरपाई देण्याचे मान्य केल्याने दशकभराच्या वादावर पडदा पडला.
मृत्युमुखी पडलेल्या एका २२ वर्षीय तरुण कामगाराचा पिता व सॅमसंगचे सह-अध्यक्ष कीम की-नाम यांनी एका औपचारिक तडजोड करारावर स्वाक्षऱ्या केल्या. इतर पीडितांनाही करारानुसार लाभ देण्याचे कंपनीने मान्य केले. तडजोडीनुसार, सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स प्रत्येक पीडित कामगार वा त्याच्या कुटुंबास १ लाख ३३,000 डॉलरची भरपाई देईल. ही भरपाई १९८४ पर्यंतच्या जुन्या कामगारांना मिळेल. एकूण १६ प्रकारचे कॅन्सर, गर्भपात, कामगारांच्या मुलांना जडलेले विविध प्रकारचे जन्मजात आजार यांसाठी ही भरपाई दिली जाईल.
याबाबत कीम की-नाम म्हणाले की, आजारी पडलेले कामगार व त्यांच्या कुटुंबीयांची आम्ही माफी मागतो. सेमीकंडक्टर निर्मितीच्या कारखान्यांत आरोग्यविषक जोखमीचे योग्य व्यवस्थापन करण्यात आम्ही अपयशी ठरलो. सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले कारखान्यांत काम करणाºया २४0 कामगारांना आजारपण जडले होते. त्यातील ८0 जण दगावले. त्यात तरुण महिलांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता. (वृत्तसंस्था)
२००७ साली उघडकीस
हे प्रकरण २00७ मध्ये उघडकीस आले होते. सुवोन येथील सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले कारखान्याच्या अनेक माजी कामगारांनी तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी आजारपणाची माहिती उघड केली होती. याप्रकरणी सुमारे १0 वर्षे कोर्टकचेºया चालल्या. न्यायालयांसह सेऊलची कामगार कल्याण संस्था तसेच एका मध्यस्थ संस्थेने याप्रकरणी अनेक निवाडे दिले. अखेर कंपनीने आपली चूक मान्य करून कामगारांशी तडजोड केली आहे.