अलास्कात सॅन्डर्स विजयी, हिलरी पराभूत
By admin | Published: March 28, 2016 12:53 AM2016-03-28T00:53:29+5:302016-03-28T00:53:29+5:30
अमेरिकी अध्यक्षपदासाठी उमेदवारी मिळविण्याच्या प्रक्रियेत डेमोक्रॅटस्चे सिनेटर बर्नी सॅन्डर्स यांनी अलास्का, वॉशिंग्टन आणि हवाई कॉकसमध्ये हिलरी क्लिंटन यांना पराभूत करून
वॉशिंग्टन : अमेरिकी अध्यक्षपदासाठी उमेदवारी मिळविण्याच्या प्रक्रियेत डेमोक्रॅटस्चे सिनेटर बर्नी सॅन्डर्स यांनी अलास्का, वॉशिंग्टन आणि हवाई कॉकसमध्ये हिलरी क्लिंटन यांना पराभूत करून त्यांच्यातील मताधिक्य कमी केले आहे.
मतमोजणी झालेल्या एकूण मतांपैकी सॅन्डर्स (७४) यांना वॉशिंग्टनमध्ये ७२ टक्क्यांपेक्षा जास्त तर अलास्कात ८० टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळाली; मात्र डेलिगेटस्चा विचार करता ६८ वर्षीय हिलरी यांचे मताधिक्य अजूनही कायम आहे. वॉशिंग्टन या महत्त्वपूर्ण राज्यात त्यांना पराभवाची झळ सोसावी लागल्याने त्यांना मोठा झटका बसल्याचे मानले जात आहे. वॉशिंग्टन राज्यात १०० पेक्षा जास्त डेलिगेटस् आहेत. त्यातील एक मोठा हिस्सा सॅन्डर्स यांच्या बाजूने वळला आहे. हवाई येथे अमेरिकी काँग्रेसमध्ये पहिल्यांदाच निवडून गेलेल्या हिंदू तुलसी गब्वार्ड यांनी सॅन्डर्स यांना समर्थन दिले होते. त्यांनी सॅन्डर्स यांना पाठिंबा देण्यासाठी डेमोक्रॅटिक पक्षाच्या सर्वोच्च पदाचा राजीनामा दिला होता. त्या सॅन्डर्स यांच्यासोबत एका जाहिरातीतही दिसतात. अलास्कात सॅन्डर्स यांच्या पत्नीने काही दिवस प्रचार केला होता. तेथे १६ डेलिगेटस् आहेत. वॉशिंग्टन आणि अलास्कात प्रायमरी निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर सॅन्डर्स आपल्या समर्थकांना उद्देशून बोलताना म्हणाले की, आमच्या प्रचाराने आता चांगलाच वेग घेतला असून त्याचा आता कोणीही इन्कार करू शकत नाही. आमची स्थिती आता सुधारत आहे. आम्ही विजयाच्या मार्गावर आहोत. आता विस्कोंसिन येथे पाच एप्रिल रोजी प्रायमरी निवडणूक होत आहे. (वृत्तसंस्था)