विरोधकांशी साटेलोटे; सभापतींना हटविले; फंडिंग बिलावरून अमेरिकन संसदेत गोंधळ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2023 06:45 AM2023-10-05T06:45:50+5:302023-10-05T06:46:04+5:30
अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्हजचे सभापती केव्हिन मॅकार्थी यांना त्यांच्या पदावरून हटविण्यात आले.
वॉशिंग्टन : अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्हजचे सभापती केव्हिन मॅकार्थी यांना त्यांच्या पदावरून हटविण्यात आले. सभागृहात मंगळवारी सत्ताधारी पक्ष डेमोक्रॅटिक पक्षाच्या २०८ लोकप्रतिनिधींनी मॅकार्थी यांच्याविरोधात मतदान केले. त्यानंतर बहुमताने हा निर्णय घेण्यात आला.
केव्हिन मॅकार्थी यांच्या विरोधात २१६ जणांनी तर रिपब्लिकन
पक्षाच्या २१० सदस्यांनी मॅकार्थी यांच्या बाजूने मतदान केले. सत्ताधारी पक्षाने विरोधात मतदान करून हाऊस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्हजच्या सभापतींना त्या पदावरून हटविल्याची घटना अमेरिकेच्या इतिहासात प्रथमच घडली आहे.
हटविण्यामागील कारण काय?
अमेरिकेतील शटडाऊन टाळण्यासाठी फंडिंग बिल मंजूर करण्यात केव्हिन मॅकार्थी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली
होती. त्यामुळे काही रिपब्लिकन सदस्य त्यांच्यावर नाराज होते. त्यामुळे त्यांच्या विरोधात ठराव मांडला होता.मॅकार्थी यांना सभापतिपदावरून हटविण्याची हीच नामी संधी असल्याचे सत्ताधारी डेमोक्रॅटिक पक्षाच्या लक्षात आले.
मॅकहेन्री बनले हंगामी सभापती
अमेरिका हाऊस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्हजच्या सभापतिपदावरून केव्हीन मॅकार्थी यांना हटविल्यानंतर एक आठवडा हे पद रिक्त राहाणार आहे. तोवर हंगामी सभापतीपदी मॅकार्थी यांचे निकटवर्तीय पॅट्रिक मॅकहेन्री यांची निवड करण्यात आली आहे.
सभापतिपदी कोणाची निवड करावी या मुद्द्याबाबत रिपब्लिकन पक्षाचे लोकप्रतिनिधी चर्चा करणार आहेत. त्यानंतर ११ ऑक्टोबरला नवा सभापती निवडण्यासाठी मतदान होणार आहे.