पाकिस्तानात सौदी एअरलाइन्सच्या विमानाला आग, पेशावरमध्ये उतरले; विमानात २७६ प्रवासी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2024 04:31 PM2024-07-11T16:31:25+5:302024-07-11T16:32:03+5:30
पाकिस्तानमधील पेशावर विमानतळावर उतरत असताना सौदी एअरलाइन्सच्या SV792 विमानाला आग लागली.
पाकिस्तानमधील पेशावर विमानतळावर एक मोठी दुर्घटना टळली आहे. येथे सौदी एअरलाइन्सच्या SV792 विमानाला आग लागली. लँडिंग गिअरच्या समस्येमुळे टायरला आग लागली. यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. फ्लाइटमध्ये सर्व २७६ प्रवासी आणि २१ क्रू मेंबर्स होते. सर्वजण सुखरुप आहेत.
टायर फुटल्याची माहिती मिळाल्यानंतर प्रवाशांमध्ये घबराट पसरली. सर्व प्रवाशांना आपत्कालीन दरवाजातून बाहेर काढण्यात आले. नागरी विमान वाहतूक प्राधिकरण आणि अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आग आटोक्यात आणली.
डकार येथील विमानतळावर एक मोठी दुर्घटना टळली
काही दिवसापूर्वी सेनेगलची राजधानी डकार येथील विमानतळावर एक मोठी दुर्घटना टळली. बोईंग ७३७ विमान धावपट्टीवरून घसरले. त्यामुळे विमानाला आग लागली आणि प्रवाशांमध्ये घबराट पसरली. या घटनेत विमानातील १० प्रवासी जखमी झाले आहेत. देशाचे परिवहन मंत्री एल मलिक एनडिया यांनी गुरुवारी सांगितले की विमानात एकूण ८५ लोक होते. ट्रान्सएअरद्वारे संचालित एअर सेनेगलचे बोईंग ७३७ विमान बुधवारी रात्री उशिरा बामाकोकडे जात होते. त्याच वेळी विमानाला अपघात झाला. विमानात ७९ प्रवासी, दोन पायलट आणि चार क्रू मेंबर्स होते. कोणतीही जिवीतहानी नाही.
विमान अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इतर लोकांची हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सेनेगलमधील बोईंग विमानाने धावपट्टी सोडल्यानंतर काही वेळा विमानतळ पुन्हा सुरू करण्यात आले, अशी माहितीही परिवहन मंत्र्यांनी दिली. एका प्रवाशाने शेअर केलेल्या व्हिडीओनुसार विमानाला आग लागल्याचे दिसले. मालियन संगीतकार झेक सिरिमने सिसोकोने फेसबुकवर एका पोस्टमध्ये लिहिले की आमच्या विमानाला नुकतीच आग लागली. विमानाच्या एका बाजूला ज्वाळांनी पेट घेतल्याने रात्रीच्या वेळी प्रवासी आपत्कालीन स्लाइडवरून खाली उडी मारताना दिसले. व्हिडिओमध्ये लोकांचा आरडाओरडाही स्पष्टपणे ऐकू येत आहे.