सौदी अरेबिया, यूएई, अमेरिका आणि भारत सुरू करणार 'हा' मेगा प्रोजेक्ट, चीनची झोप उडणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2023 02:15 PM2023-05-08T14:15:17+5:302023-05-08T14:16:53+5:30
हे देश एका मेगा प्रोजेक्टवर काम सुरू करणार असून यामुळे चीनची झोप उडणार आहे.
भारत, अमेरिका, संयुक्त अरब अमिराती आणि सौदी अरेबिया लवकरच रेल्वे नेटवर्कद्वारे मध्य पूर्व देशांना जोडणाऱ्या प्रकल्पावर काम सुरू करू शकतात. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या माध्यमातून मध्य-पूर्वे देशांना समुद्रमार्गे दक्षिण आशियाशी जोडलं जाणार असल्याचं वृत्त समोर आलं आहे. या संदर्भात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी रविवारी सौदी अरेबियामध्ये अमेरिका, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीमधील त्यांच्या समकक्षांची भेट घेतली.
अमेरिकन न्यूज वेबसाइट ॲक्सिओस नुसार, या बैठकीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी अमेरिकेनं प्रस्तावित केलेल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर चर्चा केली. दरम्यान, या प्रकल्पात भारताच्या रेल्वे नेटवर्कचं जाळं टाकण्याचं कौशल्य वापरण्याची इच्छा अमेरिकेनं व्यक्त केली आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून अमेरिकेला चीनचा वाढता प्रभाव आणि मध्य पूर्व भागातील त्यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हचा प्रभाव कमी करायचा आहे.
अहवालात म्हटलंय की ब्लू डॉट नेटवर्क या नावानं ओळखल्या जाणार्या या प्रकल्पाची पायाभरणी १८ महिन्यांपूर्वी I2U2 फोरममध्ये झालेल्या संभाषणात झाली होती. या फोरममध्ये भारत, इस्रायल, अमेरिका आणि संयुक्त अरब अमिरातीचा समावेश आहे. २०२१ च्या शेवटी, मध्यपूर्वेतील धोरणात्मक पायाभूत सुविधा प्रकल्पांवर चर्चा करण्यासाठी हा मंच तयार करण्यात आला. मध्य पूर्व भागाला जोडणाऱ्या प्रकल्पात भारताचं रेल्वे नेटवर्कचं कौशल्य अत्यंत महत्त्वाचं मानलं जातंय.
अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सुलिव्हन यांनी गुरुवारी वॉशिंग्टन इन्स्टिट्यूट फॉर नियर ईस्ट पॉलिसी येथे भाषणादरम्यान या प्रकल्पावर काम सुरू होऊ शकतं असे संकेत दिले आहेत. भारताची तीन महत्त्वाची रणनीतीक उद्दिष्ट पूर्ण होत असल्यानं भारत सरकारला या प्रकल्पाशी जोडलं जावं अशी इच्छा असल्याचं इंडियनं एक्स्प्रेसनं सूत्रांच्या हवाल्यानं म्हटलंय.