यंदाही भारतीयांना हज यात्रेची संधी नाही; कोरोनामुळे परदेशींना प्रवेश नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2021 12:49 PM2021-06-13T12:49:38+5:302021-06-13T12:49:59+5:30
सौदी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय; भारतासह जगभरातील इच्छुक भाविकांची निराशा
- जमीर काझी
मुंबई- दरवर्षी जगभरातून कोट्यवधी भाविक जमणाऱ्या सौदी अरेबियातील हज यात्रेसाठी यंदा भारतासह सर्व परदेशी नागरिकांना मज्जाव करण्यात आला आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सौदी सरकारने गुरुवारी हा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे भारतासह जगभरातील इच्छुक भाविकांची मोठी निराशा झाली आहे.
मक्का मदिना येथे येत्या २० जुलै पासून भरणाऱ्या या पवित्र यात्रेत यावर्षीही केवळ स्थानिक ६० हजार नागरिकांना अनुमती दिली जाणार आहे. सौदी सरकारने त्याबाबत हज कमिटी ऑफ इंडियाला कळविले आहे.
हज यात्रेला दरवर्षी सुमारे पावणे दोन लाख भारतीय सहभागी होत असतात. मात्र २०२० पासून कोरोनामुळे त्यामध्ये खंड पडला असून एकही भाविक तेथे जाऊ शकलेला नाही गेल्यावर्षी भारतीयासह एकाही परदेशी नागरिकांना परवानगी देण्यात आलेली नव्हती. तरीही यंदा लसीकरण व सर्व आवश्यक खबरदारी घेऊन काहींना परवानगी दिली परवानगी दिली जाईल, अशी शक्यता असल्याने हज कमिटी ऑफ इंडियाच्यावतीने त्याबाबत तयारी करण्यात आली होती. बुधवारी केंद्रीय अल्पसंख्याक विकास मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी मुंबईत हज हाऊसला बैठक घेऊन त्याचा आढावा घेतला होता. निर्बंधाच्या आदेशानुसार किमान एक हजार तर काही अटी शिथिल केल्यास ५,९०० भारतीयांना संधी मिळेल, अशी आशा होती, त्यासाठी सौदी सरकारच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून होते.
कोविड-१९ चे संकट अद्याप कमी झाले नसल्याने हजच्या विधीसाठी परदेशी नागरिकांना यावर्षी प्रवेश न देण्याचा निर्णय घेण्यात आला. सौदीत स्थायिक असलेल्या आणि दोन लस घेतलेल्या केवळ६० हजार इच्छुकांना सर्व अटींचे पालन करून हज यात्रेचा विधी करण्याची अनुमती देण्यात आलेली आहे की नाही याबद्दल अद्याप त्यांच्यकडून ठरविण्यात आलेले नाही. यावर्षी हज कमिटीकडे ५८ हजार इच्छुकांनी अर्ज केले होते. मात्र त्यापैकी केवळ १ हजार जणांनी दोन लस घेतले होते. .
सौदी सरकारचा निर्णय मान्य
अटी व निर्बंधाच्या आधारे काही भारतीयांना हजसाठी परवानगी मिळेल अशी आशा होती. मात्र सौदी सरकारने आरोग्याच्या दृष्टीने बाहेरच्या नागरिकांना यंदाही मज्जाव केले आहे. त्यामुळे यंदा कोणालाही जाता येणार नाही.
- डॉ. मकसूद अहमद खान
( मुख्य कार्यकारी अधिकारी, हज कमिटी ऑफ इंडिया).