पाकिस्तान भारतापुढे हात पसरणार?; नवी कर्जे देण्यास सौदी अरेबिया, चीनने दिला नकार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2022 06:57 AM2022-06-02T06:57:27+5:302022-06-02T06:57:33+5:30
आंतरराष्ट्रीय नाणे निधी पाकिस्तानला कर्ज देण्यासाठी कचरत आहे.
इस्लामाबाद : पाकिस्तानकडील परकीय गंगाजळी आटत चालली असून याआधी घेतलेली विदेशी कर्जे फेडायची कशी याची त्या देशाला विवंचना आहे. पाकिस्तानला नवी कर्जे देण्यास सौदी अरेबिया, चीनने नकार दिला आहे. त्यामुळे आता मदतीसाठी पाकिस्तानचे डोळे भारताकडे लागल्याची चर्चा आहे. भारत व पाकिस्तानमध्ये व्यापार वाढण्यास खूप मोठी संधी आहे, असे सूचक विधान पाकिस्तानचे पंतप्रधान शाहजाब शरीफ यांनी मंगळवारी केले होेते.
आंतरराष्ट्रीय नाणे निधी पाकिस्तानला कर्ज देण्यासाठी कचरत आहे. आमचे मित्र देशही फारशी मदत करण्यास तयार नाहीत असे वक्तव्य पाकिस्तानचे वित्तमंत्री मिफ्ताह इस्माईल यांनी म्हटले आहे. सौदी अरेबिया, यूएई व कित्येक देशांनी पाकिस्तानला कर्ज देण्यास नकार दिला. पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय नाणे निधीकडे मदत मागावी असा सल्ला आम्हाला देण्यात आला असे त्या देशाच्या वित्तमंत्र्यांनी म्हटले आहे.
भारत व पाकिस्तानच्या व्यापारात मोठी वाढ झाली तर त्याने पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेलाही उभारी मिळेल ही वस्तुस्थिती विद्यमान पंतप्रधान शाहबाज शरीफ जाणून आहेत. त्यामुळेच व्यापाराचा मुद्दा पुढे करून भारताकडून काही मदत मिळते का याची चाचपणी नवाज करत असावेत असे आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या निरीक्षकांना वाटते. (वृत्तसंस्था)