सौदी अरेबियात एकाच दिवशी ८१ जणांना फाशी; अल कायदा, इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांना मृत्युदंड
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2022 09:37 PM2022-03-12T21:37:19+5:302022-03-12T21:39:51+5:30
दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असलेल्या ८१ जणांना एकाच दिवशी फासावर लटकवलं
रियाध: सौदी अरेबियानंदहशतवाद्यांशी संबंधित आरोप असलेल्या ८१ जणांना फाशीची शिक्षा दिली आहे. विशेष म्हणजे आखाती देशांत २०२१ मध्ये जितक्या लोकांना फाशी देण्यात आली, त्यापेक्षा अधिक जणांना फाशी सौदीनं एकाच दिवसात दिली आहे. फाशी देण्यात आलेल्या लोकांनी अनेक गंभीर गुन्हे केले होते. फाशीची शिक्षा देण्यात आलेल्यांमध्ये इस्लामिक स्टेट, अल-कायदा, येमेनमधील हैती आणि अन्य दहशतवादी संघटनांचा सदस्यांचा समावेश आहे.
सौदी प्रेस एजन्सीनं (SPA) दिलेल्या माहितीनुसार, फासावर देण्यात आलेल्या ८१ पैकी ७३ जण सौदी अरेबियाचे नागरिक आहेत. सात जण येमेनचे नागरिक असून एक जण सीरियाचा आहे. मोठ्या आर्थिक केंद्रांवर हल्ला करण्याची योजना दोषींकडून आखली जात होती. यातील काहींनी सुरक्षा दलाच्या सदस्यांची हत्या केली होती. तर काही जण शस्त्रांच्या तस्करीत सहभागी होते.
आज ज्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली, त्यांच्याविरोधात सौदी अरेबियातील न्यायालयांमध्ये खटले सुरू होते. तीन वेगळ्या वेगळ्या टप्प्यांमध्ये १३ न्यायाधीशांनी या प्रकरणांमध्ये सुनावणी घेतली होती. सौदी अरेबियामध्ये सर्वाधिक फाशीच्या शिक्षा दिल्या जातात. २०२१ मध्ये सौदी अरेबियानं ६९ जणांना फाशी दिली होती.
दहशतवाद आणि कट्टरतावादी विचारधारांविरोधात सरकारची भूमिका कठोरच असेल, अशी माहिती सौदी अरेबियाच्या गृह मंत्रालयानं दिली. दहशतवाद संपूर्ण जगाच्या स्थिरतेसाठी धोकादायक आहे. कट्टर दहशतवाद आणि शेजारी देश येमेनमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराचा फटका सौदीला बसत आहे. येमेनमधील सक्रीय हैती बंडखोर सौदीला अनेकदा लक्ष्य करत असल्याचं गृह मंत्रालयानं सांगितलं.