हज यात्रेकरूंसाठी सौदी अरेबिया सरकारचा मोठा निर्णय; जगभरातील मुस्लिमांना फायदा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2023 09:18 AM2023-01-07T09:18:25+5:302023-01-07T09:18:50+5:30
सौदी अरेबिया सरकार हज आणि उमराह यात्रेकरूंसाठी प्रक्रिया सुलभ करण्याचा प्रयत्न करत आहे.
नवी दिल्ली - दरवर्षी भारतातून मोठ्या संख्येने लोक हज आणि उमराह करण्यासाठी सौदी अरेबियाला पोहोचतात. अशा परिस्थितीत भारतासह जगभरातून हजला जाणार्या यात्रेकरूंबाबत सौदी अरेबिया सरकार लवकरच मोठे पाऊल उचलणार आहे. सौदी सरकारच्या या निर्णयाचा फायदा जगभरातील कोट्यवधी लोकांना जे हजला जाऊ इच्छितात त्यांना होणार आहे.
सरकार आता हजसाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्म लॉन्च करणार आहे. सौदी अरेबिया सरकारच्या या पावलाचा फायदा केवळ हजलाच नाही तर उमराहसाठी येणाऱ्या लोकांनाही होणार आहे. सौदी अरेबिया सरकारच्या या ऑनलाइन सुविधेद्वारे भारतासह इतर देशांतून जाणारे लोक सहज हजसाठी अर्ज करू शकतात.
हज यात्रा २०२३ साठी नोंदणी सुरू
गुरुवारी, सौदी अरेबिया सरकारने जाहीर केले की, २०२३ मध्ये हजसाठी नोंदणी सेवा सुरू झाली आहे. केवळ सौदी अरेबियाचे नागरिक आणि तेथे राहणारे मुस्लिम प्रवासी हजसाठी अर्ज करू शकतात. सौदी अरेबिया सरकारच्या वतीने ट्विट करून ही माहिती देण्यात आली आहे. सौदी सरकारकडून इतर देशांतील लोकांची नोंदणी अद्याप सुरू झालेली नाही. सौदीमध्ये राहणारे लोक localhaj.haj.gov.sa द्वारे अर्ज करू शकतात. जे लोक फक्त सौदी अरेबियात राहतात, त्यांची हजसाठी निवड ऑनलाइन लॉटरी प्रणाली अंतर्गत केली जाते. अर्ज करणाऱ्यांपैकी ज्यांची नावे लॉटरीत येतात त्यांनाच हज करण्याची परवानगी आहे. मात्र, उमराहसाठी अशी कोणतीही व्यवस्था नाही.
सौदी अरेबिया सरकार हज आणि उमराह यात्रेकरूंसाठी प्रक्रिया सुलभ करण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या काही महिन्यांत हज आणि उमराहच्या प्रक्रियेतही अनेक बदल करण्यात आले आहेत. अलीकडेच सौदी अरेबिया सरकारने हजला जाणाऱ्या महिलांबाबत मोठा निर्णय घेतला होता. नव्या निर्णयानुसार आता महिला कोणत्याही पुरुष साथीदाराशिवाय (महरम) हजला जाऊ शकतात. तर यापूर्वी असा कोणताही नियम नव्हता. हजला जाण्यासाठी एक महरम असणे आवश्यक होते. अनेकदा महिलेचा नवरा, मुलगा किंवा भाऊ महरम म्हणून एकत्र हजला जातात.
त्याचवेळी, नुकतेच सौदी अरेबियाने उमराहसाठी व्हिसाच्या नियमांबाबतही अनेक बदल केले आहेत. सौदी अरेबिया सरकारने इतर देशांतून येणाऱ्या लोकांसाठी उमराह व्हिसाची मर्यादा ३० दिवसांवरून ९० दिवसांपर्यंत वाढवली आहे. उमरा व्हिसातील या बदलाचा अर्थ असा आहे की, जे उमराह करण्यासाठी सौदी अरेबियात पोहोचतात, त्यांना आधी केवळ ३० दिवस देशात राहण्याची परवानगी होती, परंतु आता ते कोणत्याही उल्लंघनाशिवाय सौदी अरेबियामध्ये ९० दिवस राहू शकतात.