सौदी अरेबियाच्या एका निर्णयानं आशियाई देशांचं टेन्शन वाढवलं, भारतालाही बसला मोठा झटका!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2022 10:47 AM2022-06-08T10:47:59+5:302022-06-08T10:49:19+5:30
जगभरात सर्वाधिक तेल निर्यात करणारा देश म्हणून ओळख असलेल्या सौदी अरेबियानं आशियाई खरेदीदार देशांसाठी तेलाच्या किमतीत अपेक्षेपेक्षा जास्त वाढ केली आहे.
नवी दिल्ली
जगभरात सर्वाधिक तेल निर्यात करणारा देश म्हणून ओळख असलेल्या सौदी अरेबियानं आशियाई खरेदीदार देशांसाठी तेलाच्या किमतीत अपेक्षेपेक्षा जास्त वाढ केली आहे.
जुलै महिन्यासाठी कच्च्या तेलाच्या किमतीत ही वाढ उन्हाळ्यात तेलाची जास्त मागणी लक्षात घेऊन करण्यात आली आहे. सौदी अरेबियाचा हा निर्णय भारतासाठीही मोठा धक्का मानला जात आहे. भारत सौदी अरेबियाकडून मोठ्या प्रमाणात तेल आयात करतो.
जुलैमध्ये आशियाई देशांसाठी अरब लाइट क्रूड ऑइलची अधिकृत विक्री किंमत (OSP) जूनच्या तुलनेत प्रति बॅरल २.१ डॉलरनं वाढली आहे. बाजार तज्ज्ञांच्या मतानुसार ही वाढ अपेक्षेपेक्षा अधिक आहे. तज्ज्ञांनी कच्च्या तेलाच्या किमतीत जवळपास प्रतिबॅरल १.५ डॉलरच्या वाढीचा अंदाज वर्तवला होता. रॉयटर्सच्या सर्वेक्षणात सहापैकी फक्त एकानं कच्च्या तेलाच्या किमतीत प्रतिबॅरल २ डॉलरपर्यंतची उडी मारण्याचा अंदाज व्यक्त केला होता.
"कच्च्या तेलाच्या किमतीत इतकी वाढ होईल असा अंदाज नव्हता. विशेषत: अरब लाइट क्रूडच्या किमतीत अशी वाढ होईल याचा विचार केला नव्हता. आम्ही या निर्णयानं खरंच चिंतेत आहोत", असं आशियातील एका ऑइल ट्रेडरनं म्हटलं आहे. जगातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या सौदी अरामकोनं ही वाढ केली आहे. जुलैमध्ये तेलाचे उत्पादन ६,४८,००० बॅरल प्रतिदिन वाढवण्याचा OPEC+ देशांमधील करार असूनही हा निर्णय घेण्यात आला आहे. रशिया, अंगोला आणि नायजेरिया सारख्या ओपेक प्लस सदस्य देशांना तेल उत्पादनाचे लक्ष्य पूर्ण करणे कठीण जात आहे. OPEC+ देशांना जुलै आणि ऑगस्टमध्ये तेल उत्पादनाचे लक्ष्य गाठण्यात अडचणी येऊ शकतात. जगातील सर्वात मोठा तेल आयातदार चीन, शांघायसह काही शहरे देखील पुन्हा लॉकडाऊनमधून बाहेर येत आहेत.
भारत आणि चीनकडून रशियाचं तेल खरेदीची स्पर्धा
भारत आणि चीन सातत्याने रशियन तेल खरेदी करत आहेत. या देशांनी युक्रेनवर केलेल्या हल्ल्यासाठी रशियावर कोणतेही निर्बंध लादण्यास नकार दिला. भारत आणि चीन मोठ्या सवलतीत रशियन तेल खरेदी करत आहेत. सौदी अरामकोने रविवारी रात्री युरोपियन आणि भूमध्यसागरीय देशांसाठी कच्च्या तेलाच्या किमती वाढवल्या. अमेरिकेसाठी कच्च्या तेलाच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.