मतदानाच्या हक्कानंतर आता सौदीतील महिलांना दिली वाहन चालवायला परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2017 08:45 AM2017-09-27T08:45:21+5:302017-09-27T10:15:16+5:30
सौदी अरेबियातील प्रशासकांकडून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
रिदाध- सौदी अरेबियातील महिलांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. सौदी अरेबियाचे प्रमुख राजे सलमान यांनी देशातील महिलांना वाहन चालवण्याची परवानगी दिली आहे. सौदीतील स्थानिक प्रसारमाध्यमांनी हे वृत्त दिलं आहे. राजे सलमान यांचा हा निर्णय सौदीतील महिलांच्यादृष्टीने खूपच महत्त्वपूर्ण असल्याची चर्चा सुरू झाली आहे. सौदी अरेबियात इस्लामी परंपरा आणि चालीरितींचा प्रचंड प्रभाव असल्याचं नेहमी पाहायला मिळतं त्यामुळे महिलांना मिळालेली वाहन चालविण्याची परवानगी महिलांच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. शाही आदेशावरून मंत्री स्तरावर एक समिती बनविण्यात आली होती. ही समिती पुढील 30 दिवसात वाहन चालवण्याच्या परवानगीच्या निर्णयावर मत मांडणार आहे. त्यानंतर जून 2018 मध्ये हा आदेश लागू करण्यात येईल.
King Salman orders driving licenses for women in the kingdom: Local media #SaudiArabia
— ANI (@ANI) September 26, 2017
सौदीच्या परराष्ट्र मंत्रालयाने ट्विटरवरून या निर्णयाची घोषणा केली आहे. सौदी अरेबियात महिलांना वाहन चालविण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. महिलांना गाडी चालविण्यावर असलेली बंदी एक सामाजिक मुद्दा मानला जातो आहे. कारण धर्म आणि कायद्याच अशा कुठल्याही बंदीचा उल्लेख नाही. गेल्या अनेक वर्षांपासून सरकार, मीडिया आणि समाजाच्यामध्ये या मुद्द्यावरून वाद सुरू आहे. महिलांना वाहन चालवायला सौदीमध्ये परवानगी नसल्याने दुनियाभरातून सौदी अरेबियावर टीका झाली.
राजा सलमान आणि त्यांचे ज्येष्ठ पुत्र आणि वारस, क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान, यांनी या महिन्यात राष्ट्रीय उत्सव साजरा करण्यासाठी राजधानी, रियाधमधील मुख्य स्टेडियममध्ये महिलांना येण्याची परवानगी दिली. यापूर्वी हे स्टेडियम फक्त पुरुषांना खेळांच्या स्पर्धा पाहण्यासाठी आरक्षित होतं. सौदी अरेबियाचे राजे सलमान आणि त्यांच्या मुलगा सौदीमध्ये अधिक मनोरंजनाला वाव देत आहेत. 1990 पासून सौदीतील अनेक महिला अधिकार कार्यकर्ते महिलांना गाडी चालविण्याच्या परवानगी मिळावी यासाठी प्रयत्न करत होत्या. कायद्यांतर्गत सगळ्यांना समान हक्क मिळावा,यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. त्या प्रयत्नांना आता यश मिळालं आहे.
सौदीमध्ये महिलांना सार्वजनिक ठिकाणी हिजाब किंवा आयबा परिधान करावा लागतो. याशिवाय, सामाजिक आणि शैक्षणिक जीवनातही त्यांच्यावर अनेक निर्बंध आहेत. हे नियम मोडणाऱ्या महिलांना शिक्षा दिली जाते. पण, गेल्या काही वर्षांमध्ये तेथिल महिलांच्या बाबतित असलेले काही नियम बदलायला सुरूवात झाली आहे. २०१५ मध्ये सौदी अरेबियातील महिलांना मतदानाचा अधिकार देण्यात आला होता. रियाध शहराच्या महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने सौदी अरेबियाच्या इतिहासात प्रथमच महिलांना मतदार आणि उमेदवार म्हणून अधिकार मिळाला होता. त्यानंतर आता महिलांना वाहन चालवण्याची परवानगी देण्याचा आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, सौदी अरेबियातील प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाचं अमेरिकेने स्वागत केलं आहे. आम्ही निश्चित पण या निर्णयाचं स्वागत करतो. देशाला योग्य दिशेने नेण्यासाठी हे महत्त्वाचं पाऊल असल्याचं, अमेरिका परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्यांनी म्हंटलं आहे.