भारत-पाकिस्तानसह २० देशांना सौदी अरेबियाचा झटका; परदेशी नागरिकांच्या प्रवासावर बंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2021 03:31 PM2021-02-03T15:31:09+5:302021-02-03T15:35:40+5:30
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सौदी अरेबियाच्या सरकारचा निर्णय
सौदी अरेबियानंभारत, पाकिस्तानसह २० देशांना मोठा झटका दिला आहे. सौदी अरेबियाच्या सरकारनं २० देशांच्या नागरिकांच्या प्रवासावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सौदी अरेबियाच्या सरकारनं हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, यातून राजकीय व्यक्ती, सौदी अरेबियाचे नागरिक आणि डॉक्टरांसह त्यांच्या कुटुंबीयांना प्रवासास मुभा देण्यात आली आहे.
दरम्यान, ही बंदी थोड्या कालावधीसाठी असल्याचं सौदी अरेबियानं स्पष्ट केलं आहे. तसंच बुधवारी रात्री ९ वाजल्यापासून ही प्रवासबंदी लागू होणार आहे. यामध्ये भारत, पाकिस्तान, लेबनान, तुर्कस्थान, इटली, पोर्तुगल, स्वीडन, स्वित्झर्लंड, अमेरिका, अर्जेंटिना, ब्राझील, इंडोनेशिया, दक्षिण आफ्रिका, इजिप्त, संयुक्त अरब अमिराती, जर्मनी, ब्रिटन, आयर्लंड, इटलीसारख्या देशांचाही समावेश आहे. या कालावधीदरम्यान पुरवठा सेवेवर कोणताही परिणाम होणार नाही आणि जहाजंदेखील जाऊ-येऊ शकतील याची काळजी घेतली जाणार असल्याचं सौदीच्या सरकारनं स्पष्ट केलं.
सौदी अरेबियाचे नागरिक, राजकीय व्यक्ती किंवा आरोग्य कर्मचारी यांना आणि त्यांनी कुटुंबीयांना देशात येण्याची परवानगी असेल. परंतु त्यांना आरोग्य मंत्रालयाच्या कोरोना विषयक नियमांचं काटेकोरपणे पालन करावं लागणार असल्याचं सांगितलं आहे. तर दुसरी पाकिस्तानला सौदी अरेबियानं यापूर्वीच झटका दिला आहे. पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सनं दिलेल्या माहितीनुसार सौदीच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारपासूनच पाकिस्तानच्या नागरिकांच्या प्रवासावर निर्बंध घातले असल्याची माहिती दिली. जर नागरिकांनी आरोग्यविषयक नियमांचं पालन केलं नाही तर त्यांच्यावर कोरोनाविषयक नवे निर्बंध घातले जाऊ शकतात असा इशारा यापूर्वी रविवारी सौदी अरेबियाचे आरोग्यमंत्री तौफिक अल-रबियाह यांनी दिला होता. पाकिस्तान आणि भारतातील अनेक लोकं सौदी अरेबियात काम करतात. या निर्णयाचा त्यांच्यावर परिणाम होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे.