सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीचा येमेनच्या बंदरावर हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2018 02:53 PM2018-06-13T14:53:13+5:302018-06-13T14:53:13+5:30
बुधवारी सकाळपासून सौदी अरेबियाने हुदायदाच्या आसपास हौती बंडखोरांच्या केंद्रावर हल्ला चढवला
सना- सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती म्हणजेच युएइने येमेनच्या बंदरावर हल्ला चढवला आहे. हुदायदा हे सौदीचे सर्वात मोठे बंदर आहे. गेली तीन वर्षे हौती बंडखोर आणि सौदी अरेबिया यांच्यामध्ये गेली तीन वर्षे लढाई सुरु आहे. गेल्या महिन्यात युएईने येमेनचे सोकोत्रा बेट ताब्यात घेतले होते. त्यामुळे या परिसरात तणाव अधिकच वाढला होता.
बुधवारी सकाळपासून सौदी अरेबियाने हुदायदाच्या आसपास हौती बंडखोरांच्या केंद्रावर हल्ला चढवला. त्यांना येमेनच्या सैनिकांच्या तुकडीनेही मदत केली. हुदायदा ताब्यात घेतल्यामुळे येमेनमधून बंडखोरांच्या गटाला बाहेर काढण्यात यश मिळेल असे बोलले जात आहे.
हे तांबड्या समुद्राच्या काठावर असणारे बंदर सौदी आणि येमेन सरकारच्या ताब्यात आल्यामुळे बाब अल-मंदाब सामुद्रधुनीवर ताबा मिळवणे शक्य होणार आहे. तसेच इराणचा बंडखोरांशी संपर्क तोडणेही आता शक्य होणार आहे. येमेनमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात दुष्काळ असून दुष्काळाने होरपळलेल्या जनतेला येथून रसद पुरवता येईल. हुदायदामध्ये 6 लाख लोक राहातात. त्या सर्वांना दुष्काळाची आणि युद्धाची झळ बसलेली आहे.
सोकोत्राची लढाई- मे महिन्याच्या सुरुवातील सोकोत्रावर संयुक्त अरब अमिरातीने 300 सैनिकांना पाठवले तसेच रणगाडेही बेटावर पाठवलेय मात्र सोकोत्राच्या रहिवाश्यांनी याला तीव्र विरोध केला. सोकोत्राचे गव्हर्नर हाशिम साद अल- साकात्री यांनी संयुक्त अरब अमिरातीच्या या निर्णयाचा निषेध केला आणि हा हल्ला म्हणजे येमेनच्या सार्वभौमत्त्वावर हल्ला आहे असे त्यांनी मत व्यक्त केले. इतके दिवस येमेन युद्धामध्ये सोकोत्रा दूर असल्यामुळे ओढले गेले नव्हते मात्र युएईच्या हल्ल्यामुळे सोकोत्रालाही फरफटत नेण्यात आले. युएईने सी-17 विमानांच्या मदतीने 2 बीएमपी-3 रणगाडे, शस्त्रास्त्रे असणारी वाहने आणि 100 फौजा तेथे उतरवल्या, दोन वर्षांपुर्वीत सोकोत्रावर लष्करी तळही उभारण्यात आला होता. या सर्व कृतीचे युएईचे परराष्ट्रमंत्री अन्वर गर्गश यांनी केले होते, आमचे सोकोत्राच्या नागरिकांशी ऐतिहासिक व कौटुंबिक संबंध आहेत असे विधान करुन हे संबंध पुन्हा एकदा प्रस्थापित करत आहोत असे युएईच्या कृतीचे समर्थन त्यांनी केले होते.