पाकच्या मदरशांना सौदीकडून साहाय्य
By admin | Published: January 31, 2016 12:31 AM2016-01-31T00:31:45+5:302016-01-31T00:31:45+5:30
सौदी अरेबियाने असहिष्णुतेच्या निर्यातीसाठी पैशांची त्सुनामी सोडली असून, पाकिस्तानातील २४ हजार मदरशांनाही तोच आर्थिक साहाय्य पुरवत आहे, असे एका ज्येष्ठ अमेरिकन सिनेटरने सांगितले.
वॉशिंग्टन : सौदी अरेबियाने असहिष्णुतेच्या निर्यातीसाठी पैशांची त्सुनामी सोडली असून, पाकिस्तानातील २४ हजार मदरशांनाही तोच आर्थिक साहाय्य पुरवत आहे, असे एका ज्येष्ठ अमेरिकन सिनेटरने सांगितले.
सौदी इस्लामी कट्टरवादाला प्रोत्साहन देत असून, अमेरिकेने त्यावरील आपले मौन सोडायला हवे, असे सिनेटर ख्रिस मर्फी म्हणाले. पाकिस्तान हे याचे उत्तम उदाहरण आहे. तेथे सौदीकडून येणाऱ्या पैशांचा वापर द्वेष आणि दहशतवादास उत्तेजन देणाऱ्या धार्मिक शाळांच्या मदतीसाठी करण्यात येत आहे.
कौन्सिल आॅफ फॉरेन रिलेशन्स या अमेरिकी विचार समूहाला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. मर्फी पुढे म्हणाले की, पाकिस्तानातील हजारो मदरशांना सौदीकडून आर्थिक मदत मिळत आहे.
सौदीसोबत असलेल्या आमच्या आघाडीचे अनेक सकारात्मक पैलू असले तरी सौदी इस्लामी कट्टरवादी विचारसरणाली उत्तेजन देत असल्याचे कटू सत्य असून इस्लामी कट्टरवादाविरुद्धची आमची लढाई अधिक केंद्रित आणि गुंतागुंतीची झालेली असताना सौदीच्या या पैलूकडे आम्हाला दुर्लक्ष करता येणार नाही, असेही मर्फी म्हणाले. सौदी जोपर्यंत त्याची ही मोहीम थांबवत नाही तोपर्यंत त्याला लष्करी साहाय्य देणे अमेरिकेने थांबवायला हवे, असेही ते म्हणाले. (वृत्तसंस्था)
- सौदी अरेबिया कट्टरवादी वहावी इस्लाम विचारसरणीच्या प्रसार मोहिमेसाठी जगभरातील मदरसे व मशिदींना आर्थिक मदत देत असून, १९६० च्या दशकापासून त्याने अशी १०० अब्ज डॉलरहून अधिक मदत दिली आहे.
- सौदीच्या या प्रसार मोहिमेची तुलना एकेकाळच्या सोव्हिएत संघाशी केल्यास सौदीने कट्टर इस्लामी विचारांच्या प्रसारासाठी पैशांची त्सुनामी सोडल्याचे दिसून येते.
- सोव्हिएत संघाने १९२० ते १९९१ दरम्यान आपल्या साम्यवादी विचारसरणीचा इतर देशांत प्रसार करण्यासाठी सात अब्ज डॉलर खर्च केले होते.