येमेन बंडखोरांविरुद्धची सौदीची सैन्य मोहीम समाप्त
By admin | Published: April 23, 2015 01:30 AM2015-04-23T01:30:45+5:302015-04-23T01:30:45+5:30
सौदी अरेबियाच्या नेतृत्वातील आघाडीच्या सैन्याने येमेनधील बंडखोरविरोधी हवाई हल्ला मोहीम समाप्त करण्याचा निर्णय घेतला आहे.
रियाध : सौदी अरेबियाच्या नेतृत्वातील आघाडीच्या सैन्याने येमेनधील बंडखोरविरोधी हवाई हल्ला मोहीम समाप्त करण्याचा निर्णय घेतला आहे. सौदी अरेबियाच्या सरकारी वृत्तवाहिनीने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. दरम्यान, इराणने या निर्णयाचे स्वागत करत हे एक सकारात्मक पाऊल असल्याचे म्हटले आहे.
‘डिसाइसिव्ह स्टॉर्म’ नामक या मोहिमेने आपले लक्ष्य प्राप्त केल्याचा दावा या वृत्तात करण्यात आला आहे. तथापि, हुथी बंडखोरांना रोखण्यात या मोहिमेस म्हणावे तसे यश प्राप्त झाले नसल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.
आघाडीच्या सैन्याने येमेनमधील हुथी बंडखोरांना रोखण्यासाठी जवळपास महिनाभर हवाई हल्ले केले. मंगळवारी ताज्या हवाई हल्ल्यात सुमारे ३० जण मारले गेले होते. यात बहुतांश सामान्य नागरिकांचा समावेश होता. हुथी बंडखोरांच्या ताब्यातील येमेनमधील तिसरे शहर असलेल्या तैझ येथील तळावर हवाई हल्ला केल्यानंतर सौदीने ही मोहीम समाप्त करण्याची घोषणा केली.
सौदी आघाडीच्या सैन्याचे प्रवक्ते ब्रिगेडिअर जनरल अहमद अल् असीरी यांनी रियाध येथे येमेन सरकार आणि राष्ट्राध्यक्ष अब्दुर्बुह मन्सूर हादी यांच्या आग्रहावरून मोहीम समाप्त करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले. (वृत्तसंस्था)