सौदीचा प्रिन्स पाकिस्तानच्या नापाक खेळीने नाराज; इम्रान खानला विमानातून हाकलले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2019 09:52 AM2019-10-07T09:52:43+5:302019-10-07T09:53:45+5:30
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सात दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर गेले होते. यावेळी युएनमध्ये सर्वसाधारण सभाही होती. यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानही अमेरिकेला गेले होते.
इस्लामाबाद : पाकिस्तानचे दिवाळे निघाल्याने पंतप्रधान इम्रान खान यांना प्रवासी विमानाने परदेश दौर करावे लागत आहेत. नुकत्याच अमेरिकेच्या दौऱ्याआधी सौदीला भेट देणाऱ्या खान यांना सौदीच्या क्राऊन प्रिन्सने त्यांच्या शाही विमानातून अमेरिकेला नेले होते. मात्र, आता धक्कादायक माहिती समोर येत आहे. अमेरिकेहून परतत असताना याच सौदीच्या प्रिन्सने इम्रान खान यांना अर्ध्या वाटेतच उतरवून घातल्याचे समजते.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सात दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर गेले होते. यावेळी युएनमध्ये सर्वसाधारण सभाही होती. यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानही अमेरिकेला गेले होते. अमेरिकेला जाण्याआधी इम्रान खान काश्मीरमुद्द्यावर समर्थन मिळविण्यासाठी सौदी अरबच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी सलमान बिन अब्दुलाजिज अल सौद यांच्याशी चर्चा केली. यानंतर ते सौद यांच्याच विमानाने अमेरिकेला गेले होते.
पाकिस्तानचे वृत्तपत्र 'फ्रायडे टाइम्स'ने दावा केला आहे की, न्यूयॉर्कहून मागे परतणाऱ्या इम्रान खान यांच्या विमानाला कोणतीही तांत्रिक बिघाड आला नव्हता. संयुक्त राष्ट्रांमधील खान यांच्या वागण्यामुळे नाराज असलेल्या सौदीचे क्राउन प्रिंस मोहम्मद बिन सलमान यांनीच त्यांना शाही विमानातून उतरवले होते. यानंतर इम्रान खान हे प्रवासी विमानाने पाकिस्तानला पोहोचले होते.
यूएनमध्ये काश्मीर मुद्द्यावरून समर्थन न मिळवू शकल्याने खान यांनी निती बदलली. त्यांनी मलेशियाचे पंतप्रधान महातर मोहम्मद आणि तुर्कीचे राष्ट्रपती रेसिप तय्यब एर्डोगन यांना पाकिस्तानच्या बाजुने बोलायला लावले. पाकिस्तानने या दोन देशांशी युती करून स्वत:ला इस्लामिक देशांचा प्रतिनिधी असल्याचे भासविले. यामुळे सौदीचा प्रिन्स नाराज झाला आणि त्याने पाकिस्तानी चमूला विमानातून हाकलून देण्याचे आदेश दिले.
सौदी अरबला पाकिस्तानने खेळलेली चाल तेव्हा समजली जेव्हा इम्रान खान यांना घेऊन विमानाने उड्डाण केले होते. प्रिन्सने अर्ध्यावरच असताना विमानाला माघारी फिरण्याचे आदेश दिले होते. मात्र, यामुळे नाचक्की होऊ नये यासाठी पाकिस्तानकडून विमानात बिघाड झाल्याचे सांगण्यता आले. यानंतर इम्रान खान दुसऱ्या दिवशी सकाऴी प्रवासी विमानातून पाकिस्तानला पोहोचले होते.