सौदीचे राजपुत्र करणार ३२ अब्ज डॉलरचा दानधर्म!
By admin | Published: July 2, 2015 02:53 AM2015-07-02T02:53:26+5:302015-07-02T02:53:26+5:30
सौदी अरबस्तानचे अब्जाधीश राजपुत्र अलवालिद बिन तलाल यांनी त्यांच्या वाट्याची सर्व म्हणजे ३२ अब्ज डॉलरची संपती आगामी काळात धर्मादाय कामांसाठी खर्च
रियाध : सौदी अरबस्तानचे अब्जाधीश राजपुत्र अलवालिद बिन तलाल यांनी त्यांच्या वाट्याची सर्व म्हणजे ३२ अब्ज डॉलरची संपती आगामी काळात धर्मादाय कामांसाठी खर्च करण्याची घोषणा बुधवारी केली.
‘किंगडम होल्डिंग’ या आपल्या कंपनीच्या मुख्यालयात ६६ व्या मजल्यावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत राजपुत्र अलवालिद यांनी सांगितले की, अमेरिकेत दानधर्मासाठी स्थापन झालेल्या बिल व मेलिंडा गेट्स फौंडेशन आणि तत्सम अन्य संस्थांच्या धर्तीवर आपणही एक स्वतंत्र ट्रस्ट स्थापन करून त्यामार्फत भावी काळात मानव कल्याणाच्या विविध योजना राबवू.
या ट्रस्टच्या प्रमुखपदी स्वत: राजपुत्र अलवालिद असतील व ट्रस्टमधील निधी कसा व केव्हा खर्च करायचा याचा निर्णय नियामक मंडळ घेईल. यासाठी प्रत्येक योजनेची काळजीपूर्वक आखणी केली जाईल, असे ते म्हणाले. मात्र पुढील किती वर्षांत हे पैसे खर्च केले जातील याची निश्चित कालमर्यादा त्यांनी दिली नाही. तरीही आपण हयात नसलो तरी या धर्मादाय निधीचा वापर इच्छित उद्दिष्टांसाठी सुरुच राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. आपल्या या दानधर्मामुळे ‘ सांस्कृतिक सलोख्यास मदत मिळेल, महिलांचे सबलीकरण होईल, युवापिढीला मदतीचा हात मिळेल, आपत्तीग्रस्तांचे अश्रु पुसले जातील आणि अधिक सहिष्णु व सामजस्यपूर्ण जग घडवायला हातभार लागेल‘, अशी आशा अलवालिद यांनी एका निवेदनात व्यक्त केली. मात्र दानधर्मासाठीच्या या निधीत ‘किंगडम होल्डिंग’च्या पैशाचा समावेश नाही, असेही त्यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)