सौदी महिलेने गायकाला स्टेजवर मिठी मारली...अन्....
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2018 12:41 PM2018-07-16T12:41:12+5:302018-07-16T12:43:17+5:30
मोहान्दीसला अरबी गायनाचा राजकुमार असं म्हटलं जातं. त्यानं अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. इराकमध्ये जन्मलेल्या मोहान्दीसने सौदी अरेबियाचे नागरिकत्व स्वीकारले आहे.
रियाध- सौदी अरेबिया आता थोडा मोकळा होतोय, महिलांना वाहन चालवण्याचा अधिकार दिला जात आहे, चित्रपटगृहांना सुरुवात होत आहे म्हणजे आता इतर जगासारखा हा देश मोकळाढाकळा झाला असं तुम्हाला वाटेल. पण नाही सौदी अरेबियात असं स्वतंत्र जगण्याचं वारं अजून तरी लवकर वाहू लागेल असं दिसत नाही. एका सांगितिक मैफिलित गाणं पूर्ण झाल्यावर एका सौदी महिलेने गायकाला मिठी मारली. त्यानंतर तिच्या या "अपराधा" बद्दल तिला अटक करण्यात आली आहे.
‘Saudi woman 'arrested for hugging' singer.’ In case you needed reminded that, for all the talk of reform and modernisation, Saudi Arabia is still a fundamentalist regime. https://t.co/iEm1UxtmxM
— Amanda Kendal (@AmandaKendal) July 14, 2018
सौदी अरेबियातील ताइफमध्ये माजिद अल मोहान्दीस या गायकाची मैफल झाल्यानंतर एक महिला पळत थेट स्टेजवर गेली आणि तिने त्याला मिठी मारली. सौदी अरेबियामध्ये महिला आणि पुरुषांना असे मोकळेपणाने वावरण्यास, कृती करण्यास बंदी आहे. त्यामुळे या महिलेला तात्काळ अटक करुन तिच्यावर पुढील कारवाई सुरु करण्यात आली.
महिलेने गायकाला मिठी मारली आहे आणि सुरक्षारक्षक तिला त्याच्यापासून बाजूला करत आहेत असे व्हीडीओही प्रसिद्ध झाले आहेत. मोहान्दीसला अरबी गायनाचा राजकुमार असं म्हटलं जातं. त्यानं अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. इराकमध्ये जन्मलेल्या मोहान्दीसने सौदी अरेबियाचे नागरिकत्व स्वीकारले आहे. हा प्रकार झाल्यानंतर त्यानं कार्यक्रम सुरुच ठेवला.
सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये महिलांना यापुर्वी अनेक वर्षे मज्जाव करण्यात आला होता. मात्र गेल्या वर्षी प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी ही बंदी उठवली होती. तसेच महिलांसाठी मैफिली आणि फूटबॉल सामन्यांचेही आयोजन करण्यात आले. इतकेच नव्हे तर लेबनिज गायिका हिबा तावाजी हीची मैफिलही आयोजित करण्यात आली. त्यानंतर महिलांना कार चालवण्यास परवानगी देण्यात आली मात्र असे सगळे असले तरी सौदी आपल्या जुनाट सार्वजनिक संकेत-नियमांमधून बाहेर आलेला नाही.