संघर्षाचा विजय ! भारताच्या 'या' मुलीमुळे आयर्लंडमधील गर्भपातासंबंधी कठोर कायद्यामध्ये बदल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2018 08:55 AM2018-05-27T08:55:42+5:302018-05-27T09:04:27+5:30
आयर्लंडमध्ये गर्भपातासंदर्भात सर्वाधिक कठोर कायदे आहेत. मात्र, शनिवारी (26 मे) गर्भपातासंबंधी झालेल्या जनमत चाचणीत 66.4 टक्के लोकांनी गर्भपातावरील बंदी उठवण्याचं समर्थन केले आहे.
नवी दिल्ली - आयर्लंडमध्ये गर्भपातासंदर्भात सर्वाधिक कठोर कायदे आहेत. मात्र, शनिवारी (26 मे) गर्भपातासंबंधी झालेल्या जनमत चाचणीत 66.4 टक्के लोकांनी गर्भपातावरील बंदी उठवण्यासाठी मत नोंदवत आपले समर्थन दर्शवले आहे. या निकालामुळे एका संघर्षाचा विजय झाला आहे. बीबीसीनं दिलेल्या वृत्तानुसार, आयर्लंडमध्ये महिलांच्या जिवाला धोका निर्माण झाल्यासच गर्भपात करण्याची परवानगी दिली जाते. मात्र बलात्कार प्रकारात गर्भपात करण्याची अनुमती येथे नाही. दरम्यान, गर्भपातासंदर्भात घेण्यात आलेल्या जनमत चाचणीच्या निकालामुळे भारताच्या एका मुलीच्या कुटुंबीयांनी जल्लोष साजरा केला आहे.
काय आहे नेमका यामागील संघर्ष ?
कर्नाटकमधील बेळगावातील सविता हलप्पनवारचं कुटुंबीय या जनमत चाचणीच्या निकालामुळे अत्यंत आनंदी आहेत. भारतीय डेंटिस्ट असलेल्या सविता हलप्पनवारला 2012 साली गर्भपात करण्याची परवानगी देण्यात न आल्यानं तिचा आयर्लंडमधील एका हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. गर्भपात करण्यासाठी वारंवार मागणी करुनदेखील तिला परवानगी देण्यात आली नाही. गर्भावस्थेत संसर्ग झाल्यानं सविताचा मृत्यू झाला होता. सविताच्या मृत्यूमुळे आयर्लंडमध्ये गर्भपातासंदर्भात असलेल्या कठोर कायद्यांचा मुद्दा चर्चेत आला होता व येथून संघर्षास सुरुवात झाली.
(नकोशींना संपविणाऱ्यांनाही हवी कठोर शिक्षा !)
66 टक्के जणांनी नोंदवलं समर्थन
येथील पंतप्रधान लिओ वरदकर यांनी शनिवारी जनमत चाचणीच्या निकालांची घोषणा केली. गर्भपातासंबंधी आलेल्या पहिल्या अधिकृत अहवालानुसार गर्भपातासंबंधी असलेले कठोर कायदे रद्द करण्यासाठी 66 जणांनी समर्थन दर्शवले आहे. वरदकर यांनी असंही सांगितले की, लोकांनी आपलं मत जाहीरपणे मांडले आहे. एका आधुनिक देशासाठी आधुनिक संविधानाची आवश्यकता आहे.
'गर्भपातासंबंधी नवीन कायद्याचं नाव सविला लॉ असावं'
दरम्यान, या निकालामुळे सविताचे कुटुंबीय अत्यंत आनंदी आहेत. सविताचे वडील म्हणाले की, ''मी या बातमीमुळे अत्यंत खूश आहे. गर्भपाताच्या नवीन कायद्याला माझ्या मुलीचं नाव द्यावे. नव्या कायद्याला 'सविता लॉ' असे नाव देण्यात यावे, अशी आमची शेवटची इच्छा आहे. शिवाय, या चाचणीमध्ये समर्थन दर्शवणाऱ्या आयर्लंडमधील नागरिकांचे मी धन्यवाद करू इच्छितो. हा महत्त्वपूर्ण निर्णय असून कित्येक महिलांनी यासाठी संघर्ष केला आहे''.
Irish election official confirms landslide victory for abortion rights advocates as Ireland repeals constitutional ban, reports The Associated Press. pic.twitter.com/rDLUk5ltgG
— ANI (@ANI) May 26, 2018