म्हणे...तिच्या मृत्यूची किंमत केवळ ९ लाख, भारतीय मुलीच्या मृत्यूवर पोलिस हसला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2023 06:37 AM2023-09-15T06:37:06+5:302023-09-15T06:37:53+5:30
United State: अमेरिकेच्या सिएटल शहरात पोलिसांच्या गस्ती वाहनाची धडक लागून जान्हवी कमदुला या भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. अपघातानंतर चौकशीसाठी आलेल्या पोलिस अधिकाऱ्याने तिच्या मृत्यूची खिल्ली उडवली.
वॉशिंग्टन - अमेरिकेच्या सिएटल शहरात पोलिसांच्या गस्ती वाहनाची धडक लागून जान्हवी कमदुला या भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. अपघातानंतर चौकशीसाठी आलेल्या पोलिस अधिकाऱ्याने तिच्या मृत्यूची खिल्ली उडवली. त्याचा व्हिडीओ आणि ऑडिओ व्हायरल झाला आहे. सॅन फ्रान्सिस्कोतील भारतीय वकिलातीने या घटनेचा निषेध करत कारवाईची मागणी केली आहे.
पोलिस अधिकारी भारतीय विद्यार्थिनीच्या मृत्यूची खिल्ली उडवत असताना त्याच्या शरीरावरील कॅमेरा (बॉडीकॅम) सुरू होता. त्यात त्याचे हे बोलणे ध्वनिमुद्रित झाले आहे. मुलगी अपघातानंतर ४० फूट उडाली नव्हती. मात्र, ती दगावली, असे तो त्यात म्हणतो. त्यानंतर तो जोरजोराने हसतो. नंतर म्हणतो ती एक सामान्य व्यक्ती होती. ११ हजार डॉलरचा (९ लाख रुपये) चेक दिल्याने काम होऊन जाईल. त्यानंतर तो पुन्हा हसत म्हणतो, ती केवळ २६ वर्षांची होती. तिच्या मृत्यूची किंमत अतिशय कमी होती.
जानेवारी महिन्यात जान्हवीचा मृत्यू झाला होता. एका कर्मचाऱ्याने नियमित तपासणीचा भाग म्हणू ध्वनीमुद्रित संभाषण ऐकल्यानंतर या प्रकाराला वाचा फुटली. (वृत्तसंस्था)
मी केवळ ॲटर्नीची नक्कल करत होतो...
जान्हवीच्या मृत्यूची खिल्ली उडविणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याचे डॅनियल ऑडेेरेर असे नाव आहे. त्याने त्याच्यावर होत असलेले आरोप चुकीचे असल्याचे सांगितले. तो म्हणाला, मी केवळ शहराच्या ॲटर्नीची नक्कल करत होतो. जे अशा प्रकरणांत शिक्षा सुनावताना हलगर्जीपणा करतात. मात्र, कम्युनिटी पोलिस कमिशनने या प्रकरणावर टीका केली असून, हे अत्यंत दु:खद असल्याचे म्हटले आहे.