...म्हणे, शांती प्रक्रियेत भारताचे सहकार्य नाही
By Admin | Published: August 30, 2015 12:37 AM2015-08-30T00:37:02+5:302015-08-30T00:37:02+5:30
भारत आणि पाकिस्तानमध्ये मैत्रीपूर्ण संबंध राहण्यासाठी आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत; पण भारताचे सहकार्य मिळत नाही, असा अजब दावा पाकिस्तानचे गृहमंत्री निसार
इस्लामाबाद : भारत आणि पाकिस्तानमध्ये मैत्रीपूर्ण संबंध राहण्यासाठी आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत; पण भारताचे सहकार्य मिळत नाही, असा अजब दावा पाकिस्तानचे गृहमंत्री निसार अली खान यांनी केला आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय चर्चा रद्द झाल्यामुळे उभय देशांतील संबंधात दरी निर्माण झालेली असतानाच पाकिस्तानचे गृहमंत्री निसार अली खान यांनी हे वक्तव्य केले आहे, हे विशेष.
ते म्हणाले की, काश्मीरमधील नेत्यांसोबत आमच्या संभाव्य चर्चेबाबत भारत सरकारने घेतलेला आक्षेप योग्य नव्हता. तथापि, दोन्ही देशांतील चर्चेदरम्यान काश्मीरच्या मुद्यावर आक्षेप नोंदवत भारताने एक प्रकारे सुरक्षा आणि स्थिरताच अडचणीत आणल्याचा अजब दावाही निसार अली खान यांनी केला आहे.
दरम्यान, पाकिस्तानचे गृहमंत्री निसार अली खान यांनी काल ब्रिटनचे विदेश सचिव फिलिप हेमंड यांची लंडनमध्ये भेट घेतली. सद्य परिस्थितीची त्यांना माहिती दिल्याचे सांगून निसार अली खान म्हणाले की, भारत आणि पाकिस्तान यांच्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी काश्मीर मुद्दा हा महत्त्वाचा आहे. तथापि, हाच मुद्दा अडथळाही ठरत आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने उभयदेशांना चर्चेद्वारे समस्या सोडविण्याचे आवाहन केले आहे. (वृत्तसंस्था)