...म्हणे भारताकडे ५.६ अब्ज रुपये थकीत
By admin | Published: July 18, 2014 01:43 AM2014-07-18T01:43:55+5:302014-07-18T01:43:55+5:30
फाळणीला ६७ वर्षे उलटल्यानंतर पाकिस्तानने भारताकडे आपली तब्बल ५.६ अब्ज रुपयांची रक्कम थकीत असल्याचा दावा केला
कराची : फाळणीला ६७ वर्षे उलटल्यानंतर पाकिस्तानने भारताकडे आपली तब्बल ५.६ अब्ज रुपयांची रक्कम थकीत असल्याचा दावा केला असून यावरून वादंग होण्याची चिन्हे आहेत.
भारत आपला ५.६ अब्ज रुपयांचे देणे लागतो. भारतीय रिझर्व्ह बँकेकडील (आरबीआय) ही थकबाकी फाळणीदरम्यानची आहे. फाळणीच्या वेळी ही रक्कम ४९ कोटी रुपये होती. फाळणीच्या ६७ वर्षांनंतर महागाई, चलन विनीमय दर व रोखे दरातील बदलांमुळे वाढून ती ५.६ अब्ज झाली असल्याचे पाकिस्तानने म्हटले
आहे.
पाकिस्तान आणि भारतादरम्यान झालेल्या कोणत्याही चर्चेत पाकने थकीत रकमेचा कधीही उल्लेख केलेला नाही. मात्र, स्टेट बँक आॅफ पाकिस्तान दरवर्षी आपल्या वार्षिक अहवालामध्ये भारताकडील कथित थकीत रकमेचा उल्लेख करते. आतापर्यंत याबाबत फारशी चर्चा झाली नव्हती; मात्र पाक माध्यमांनी हा मुद्दा उचलून धरल्याने त्यावर आता चर्चा सुरू झाली आहे. (वृत्तसंस्था)
स्वातंत्र्याच्या वेळी ४९ कोटी रुपयांची थकबाकी होती; मात्र महागाई, चलन विनिमय दर व समभाग दरातील बदलांमुळे यात वेगाने वाढ झाली, असे एक्स्प्रेस ट्रीब्यूनमध्ये प्रकाशित एका वृत्तात म्हटले आहे. स्टेट बँक आॅफ पाकिस्ताननुसार ४.१ अब्ज रुपयांची सोन्याची नाणी, ५० कोटींचे ब्रिटिशकालीन रोखे, भारत सरकारचे २४ कोटी रुपयांचे रोखे आणि ४९ लाख रुपयांची नाणी एवढी पाकची भारतावर थकबाकी आहे.
१९४७ मध्ये झालेल्या एका करारावरून पाक हा दावा करतो. या करारानुसार फाळणीनंतरही दोन्ही देशांची एकच बँक भारतीय रिझर्व्ह बँक होती आणि ३० सप्टेंबर १९४८ पर्यंत पाकमध्ये भारतीय रुपया चालत होता.