सय्यद सलाउद्दीन दहशतवादी नाही, पाकच्या उच्चायुक्तांनी केली पाठराखण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2017 09:42 AM2017-08-02T09:42:22+5:302017-08-02T09:45:22+5:30
भारतातील पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांना आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केलेल्या हिजबुल मुजाहिद्दीनचा म्होरक्या सय्यद सलाउद्दीनचा पुळका आला आहे. सलाउद्दीनबाबत प्रतिक्रिया देताना बासित म्हणाले की, ''पाकिस्तान सलाउद्दीनला दहशतवाद्याच्या स्वरुपात पाहत नाही. सलाउद्दीन काश्मिरींच्या अधिकारांसाठी लढत आहेत. जेथे पाकिस्तानचा मुद्दा आहे तर आम्ही सलाउद्दीनला एखाद्या दहशतवादी म्हणून पाहत नाही'', असे सांगत बासित यांनी सलाउद्दीनची पाठराखण केली आहे.
नवी दिल्ली, दि. 2 - भारतातील पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांना आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केलेल्या हिजबुल मुजाहिद्दीनचा म्होरक्या सय्यद सलाउद्दीनचा पुळका आला आहे. सलाउद्दीनबाबत प्रतिक्रिया देताना बासित म्हणाले की, ''पाकिस्तान सलाउद्दीनला दहशतवाद्याच्या स्वरुपात पाहत नाही. सलाउद्दीन काश्मिरींच्या अधिकारांसाठी लढत आहेत. जेथे पाकिस्तानचा मुद्दा आहे तर आम्ही सलाउद्दीनला एखाद्या दहशतवादी म्हणून पाहत नाही'', असे सांगत बासित यांनी सलाउद्दीनची पाठराखण केली आहे.
ज्यावेळी सलाउद्दीनची आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषणा करण्यात आली होती त्यावेळी देखील पाकिस्ताननं सलाउद्दीनचा बचाव करण्याचा प्रयत्न केला आहोत. ''काश्मीरमधील नागरिकांच्या हक्काविषयी बोलणाऱ्याला दहशतवादी घोषित करणं अयोग्य आहे'', असे सांगत पाकिस्तानने सलाउद्दीनचा बचाव केला होता.
पुढे बासित असेही म्हणाले आहेत की, ''तो जे काही करत आहे, त्याकडे पाकिस्तान व जम्मू काश्मीरच्या स्वयंनिर्णय अधिकारासाठीची लढाई या स्वरुपात पाहिले जाते. अमेरिकेने दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिद्दीनचा म्होरक्या सय्यद सलाऊद्दीनला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले आहे. या निर्णयाशी आम्ही सहमत नाही आणि आम्ही या निर्णयावर आक्षेपही नोंदवला होता''.
दरम्यान, NIAच्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांच्या यादीतही सलाउद्दीनचा समावेश आहे. अमेरिकेने हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी सय्यद सलाऊद्दीनला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले. काश्मीरमध्ये वाढलेल्या हिजबुलच्या वाढत्या दहशतवादी कारवायांचीही दखल अमेरिकेने घेतली आहे.
कोण आहे सय्यद सलाउद्दीन ?
दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिद्दीन या संघटनेचा सय्यद सलाउद्दीन प्रमुख आहे. या संघटनेने जम्मू आणि काश्मीरसह भारतात अनेक दहशतवादी हल्ले केले आहेत. 2014 मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाची जबाबदारीही सय्यद सलाउद्दीनच्या संघटनेनेच घेतली होती. या हल्ल्यात 17 जण जखमी झाले होते.
तर दुसरीकडे दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदसंदर्भात विचारले असता बासित म्हणाले की, सईदला नजरकैदेत ठेवण्यात आले असून आम्ही हाफिजविरोधात अधिक पुरावे मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत. पुरेसे पुरावे मिळवण्यात यश आले की पुढील कारवाई करण्यात येईल.
हाफिज सईद 31 जानेवारीपासून नजरकैदेत आहे. हाफिजसहीत अब्दुल्ला उबैद, मलिक जफर इकबाल, अब्दुल रहमान आबिद व काजी आसिफ हुसैन या चार जणांनादेखील ताब्यात घेण्यात आले आहे.