आता कचरा ‘सांगणार’ किम जोंगची ‘सिक्रेट्स’; ‘खजिना’ न सापडल्यानं आलं रडू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2022 06:43 AM2022-04-29T06:43:29+5:302022-04-29T06:43:47+5:30
समुद्रकिनाऱ्यावर अनेक गोष्टी वाहून येतात. त्यात चांगल्या-वाईट अनेक गोष्टी असतात.. खरं तर इतर सर्व लोकांसाठी तो ‘कचरा’च, पण प्रो. कांग यांच्या दृष्टीनं मात्र ही ‘संपत्ती’च आहे..
चीन हा एक असा देश आहे, ज्यानं आपल्या देशाची दारं जगापासून बंद करून ठेवली आहेत. साखळदंडानं ती इतकी करकचून बांधून ठेवली आहेत, की आत काय चाललं आहे, ते कोणालाही काहीही कळू नये. जगभरातून कोणीही तिथे गेलं, तरी त्यांना आतली खबरबात कळणार नाही, इतकी त्यांची नाकेबंदी आणि तटबंदी कडक आहे. बाहेरच्या लोकांचं जाऊ द्या, पण ‘घरातल्या’ लोकांनाही तिथे अनेक गोष्टी कळत नाहीत. ज्यांना त्या माहीत आहेत, त्यांनाही त्या बाहेर फोडण्याची परवानगी नाही. चीनचा हा ‘ऐतिहासिक वारसा’ तसा जगभरातल्या सगळ्याच लोकांना माहीत आहे. याच यादीत आणखी एक देश आहे, तो म्हणजे उत्तर कोरिया. अनेक बाबतीत तर त्यानं चीनवरही मात केली आहे. उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन यानं आपल्या देशाची तटबंदी आणखीच कडक केली आहे.
कोरोनाकाळात अनेक देशांनी परदेशातील लोकांना आपल्या देशात प्रवेशासाठी बंधनं घातली असली, तरी उत्तर कोरियानं मात्र कोरोना नसतानाही बाहेरच्या जगापासून आपला देश ‘लपवून’ ठेवला आहे. अण्वस्त्र विकासाचा कार्यक्रम उत्तर कोरियानं हाती घेतल्यापासून तर त्यांनी आपल्या देशाला जगापासून आणखीच अलिप्त केलं आहे. त्यामुळे तिथे नेमकं काय चालू आहे, याबाबत कोणालाच काहीही कळत नाही. अलीकडच्या काळात हे गूढ आणखी वाढलं आहे. त्यामुळे देशातील सर्वाधिक ‘बंद’ देशांमध्ये उत्तर कोरियाचे नाव आवर्जून घेतलं जातं..पण तरीही तिथे काय चाललं आहे, लोकं कसं जगतात, कोणत्या गोष्टी, उत्पादनं ते वापरतात, कोणती उत्पादनं तिथे घेतली जातात, कोणत्या वस्तू आयात केल्या जातात.. याविषयी जगाला उत्सुकता आहेच. मात्र ही कडेकोट तटबंदी भेदायची कशी? उत्तर कोरियाचा शेजारी देश दक्षिण कोरियाचे संशोधक; दोंग-ए युनिव्हर्सिटीचे प्रो. कांग दोंग वान यांनी एक वेगळीच युक्ती योजली आहे. त्यांच्या या युक्तीला जगभरातून दाद मिळते आहे..
समुद्रकिनाऱ्यावर अनेक गोष्टी वाहून येतात. त्यात चांगल्या-वाईट अनेक गोष्टी असतात.. खरं तर इतर सर्व लोकांसाठी तो ‘कचरा’च, पण प्रो. कांग यांच्या दृष्टीनं मात्र ही ‘संपत्ती’च आहे.. कारण उत्तर कोरियाच्या बाजूनं दक्षिण कोरियाच्या समुद्रकिनाऱ्यावर ज्या गोष्टी वाहून येतात, त्यात उत्तर कोरियाची ‘संस्कृती’ही असते, असं प्रो. कांग यांचं म्हणणं आहे. त्यांच्या मते उत्तर कोरियात जाता येत नसलं, तरी तिथे ‘राजरोसपणे घुसण्याची’ ही सोन्याची किल्ली आहे. चीन आणि उत्तर कोरिया यांची सीमाही एकमेकांना लागून आहे. तेथील यालू या नदीनं या दोन्ही देशांची सीमा विभागलेली आहे. कोरोनाकाळापूर्वी चीनमध्ये येण्यास इतर देशांतील नागरिकांना बंदी नव्हती तेव्हा प्रो. कांग चीन येथील यालू नदीच्या किनारी भागात भेट देत असत. उत्तर कोरियाचे काही नागरिक त्या भागात येत असत. त्यांच्याशी बोलून आणि नदीकिनारी सापडलेल्या वस्तू गोळा करून उत्तर कोरियात काय चाललंय याचा अंदाज प्रो. कांग बांधत असत.
कोरोनामुळे चीनच्या सीमा बंद झाल्यानंतर प्रो. कांग यांनी आपल्याच देशातील पश्चिम सागरी किनाऱ्यांवर भेटी द्यायला सुरुवात केली. तेथील पाच समुद्र किनारे त्यांनी अनेकदा पालथे घातले. उत्तर कोरियाच्या बाजूनं वाहून आलेल्या जवळपास दोन हजारपेक्षा जास्त वस्तू प्रो. कांग यांनी गोळा केल्या आहेत. त्यांच्या दृष्टीनं उत्तर कोरियाचा ‘शोध लावण्यासाठी’हा खूप मोठा खजिना आहे. प्रो. कांग यांच्या या खजिन्यात वेगवेगळ्या स्नॅक्सची पाकिटं, ज्यूसचे पाऊच, कँडी रॅपर्स, पाण्याच्या, शीतपेयांच्या बाटल्या, आईस्क्रीमचे कप.. अशा अनेक गोष्टी आहेत.
प्रो. कांग यांच्या मते, किम जोंग उन यांनी आपल्या देशातील लोकांच्या माना करकचून आवळून ठेवल्या असल्या, तरी ज्यांना ‘पश्चिमेच्या वाऱ्याचा गंध’ लागला आहे, जे ‘भांडवलशाही’ अर्थव्यवस्थेतून वस्तू खरेदी करू शकतात, अशा साऱ्यांच्याच मुसक्या ते आवळू शकत नाहीत. त्यांना खूश करण्यासाठी किम जोंग उंग यांनी उपभोग्य वस्तू आपल्या देशात याव्यात यासाठीही प्रयत्न सुरू केले आहेत. या वस्तूंच्या विश्लेषणावरून प्रो. कांग यांनी अनेक निष्कर्ष काढले आहेत.. उत्तर कोरियात साखरेची कमी आहे. त्यामुळे तिथे ‘साखरेसाठी’ झाडाच्या पानांचा वापर केला जातो. तिथल्या अनेक वस्तू आजही ‘क’ दर्जाच्या आहेत. जपानी आणि दक्षिण कोरियाच्या वस्तूंची नक्कलही त्यांनी केलेली आहे. ‘नैसर्गिक’ वस्तू खरेदीची ऐपत नसल्यानं अनेक लोक कृत्रिम स्वादाचा वापर करतात. नि:सत्व अन्नपदार्थांमुळे आरोग्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत. तेथील महिलांचं जीवन अजूनही अतिशय क्लेशकारक आहे..
‘खजिना’ न सापडल्यानं आलं रडू!
आपल्या या अनुभवांवर आधारित नुकतंच एक पुस्तकही प्रो. कांग यांनी लिहिलं आहे. त्यात उत्तर कोरियाचा ‘वर्तमान इतिहास’ त्यांनी मांडला आहे. समुद्रकिनारी वेळी-अवेळी ‘कचरा’ गोळा करत असल्यामुळे अनेक अडचणींचाही त्यांना सामना करावा लागला. काही वेळा त्यांना अडवण्यात आलं. अनेकदा कित्येक किलोमीटरची पायपीट करूनही कोणतीच ‘मौल्यवान’ वस्तू न सापडल्यामुळे त्यांना रडूही आलं.