भारतीय-अमेरिकन विद्यार्थ्यांनी बनविले स्कॉलरली अॅप
By Admin | Published: March 18, 2016 01:55 AM2016-03-18T01:55:08+5:302016-03-18T01:55:08+5:30
दोन भारतीय-अमेरिकन विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी ते (विद्यार्थी) ज्या भागात राहतात तेथील शिक्षकाशी जोडले जाण्यास मदत करणारे अॅप्लिकेशन (अॅप) तयार केले आहे.
होस्टन : दोन भारतीय-अमेरिकन विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी ते (विद्यार्थी) ज्या भागात राहतात तेथील शिक्षकाशी जोडले जाण्यास मदत करणारे अॅप्लिकेशन (अॅप) तयार केले आहे.
हे अॅप तयार करणारे सुलतान खान आणि हसीथ सांका हे युनिव्हर्सिटी आॅफ कॅलिफोर्निया, रिव्हरसाईडमध्ये (यूसीआर) संगणक शाखेचे विद्यार्थी आहेत. गेल्या वर्षी आॅक्टोबरमध्ये भरलेल्या जगातील सर्वात मोठ्या शैक्षणिक प्रदर्शनामध्ये या दोघांनी बनविलेल्या अॅपला पहिला क्रमांक मिळाला होता.
या अॅपचे नाव ‘स्कॉलरली’ असे असून गुगल प्ले आणि अॅपल अॅप स्टोअरवर ते मोफत डाऊनलोड करता येते. हे अॅप ट्यूटर प्रोफाईल्स बघायला, शिक्षकाला भेटण्यासाठी ठिकाण ठरवायला आणि एक बटण दाबताच आपला अभ्यास करायला मदत करते.
या अॅपचा शिक्षक (ट्यूटर) आणि विद्यार्थी अशा दोघांनाही फायदा आहे. शिक्षकाला यातून जास्त पैसे मिळू शकतील आणि विद्यार्थ्याला आवश्यक तेव्हा शिक्षकाची मदत घेता येईल. यासाठी वापरायचा आहे तो फक्त स्मार्टफोन. शिक्षकाची सेवा उपलब्ध होण्यामुळे विद्यार्थ्यांची मोठी सोय होईल, असे सांका आणि खान यांनी सांगितले.
खान आणि सांका यांनी गेल्या वर्षी आॅक्टोबरमध्ये ‘हॅकिंग एज्यू’मध्ये ‘स्कॉलरली’चे अँड्रॉईड व्हर्जन विकसित केले होते. तेथील स्पर्धेमध्ये जगातील विद्यापीठांतून सुमारे एक हजार हॅकर्स सहभागी झाले होते. शिक्षण व्यवस्थेचा दर्जा सुधारण्यासाठी या विद्यार्थ्यांना त्यांच्या कल्पना प्रत्यक्ष सॉफ्टवेअरमध्ये रूपांतरित करून दाखवायच्या होत्या. त्यासाठी वेळ दिला होता फक्त ३६ तासांचा. खान आणि सांका यांनी निवड समितीसमोर ‘स्कॉलरली’चे सादरीकरण करून या अॅपसाठी पहिला क्रमांक पटकावला. तेव्हापासून हे दोघे अँड्रॉईड अॅप सुधारण्याचे आणि आयओएस व्हर्जन तयार करण्याच्या कामात गुंतले होते. (वृत्तसंस्था)