कोरोना उद्रेकामुळे पाकमधील शाळा, महाविद्यालये पुन्हा बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2020 01:16 AM2020-11-24T01:16:55+5:302020-11-24T01:17:15+5:30
दोन महिन्यांपूर्वीच झाली होती सुरुवात : ११ जानेवारीला सुरू होणार
इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये कोरोना उद्रेकामुळे सर्व शैक्षणिक संस्था २६ नोव्हेंबरपासून १० जानेवारीपर्यंत पुन्हा बंद करण्याचा निर्णय सोमवारी घेण्यात आला. पाकिस्तानच्या शिक्षणमंत्र्यांच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे दोन महिन्यांपूर्वीच शाळा, महाविद्यालये उघडण्यात आली होती.
पाकमध्ये आजवर ३.७ लाख लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला होता व ७,७०० जणांना जीव गमवावा लागला होता. संघीय शिक्षणमंत्री शफकत महमूद यांच्या अध्यक्षतेखाली चार प्रांतांच्या शिक्षणमंत्र्यांची, तसेच पाकव्याप्त काश्मीर, गिलगिट-बाल्टिस्तानच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. त्यानंतर महमूद यांनी सांगितले की, सर्व शाळा, कॉलेज, विद्यापीठांध्ये ऑनलाईनच्या माध्यमातून शिक्षण सुरू ठेवण्यात येणार असून, सर्व शिक्षण संस्था २६ नोव्हेंबरपासून २४ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. थंडीच्या सुट्या २५ डिसेंबरपासून सुरू होऊन १० जानेवारीपर्यंत असतील. शिक्षण संस्था ११ जानेवारी रोजी उघडतील; परंतु त्या आधी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात स्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक होईल.
महामारीच्या सुरुवातीच्या काळात शिक्षण संस्था बंद राहिल्यानंतर १५ सप्टेंबर रोजी उघडण्यात आल्या होत्या. आता परीक्षा तूर्त रद्द करण्यात आल्या आहेत. जानेवारीमध्ये शिक्षण संस्था उघडल्यानंतर त्यांचे आयोजन करण्यात येईल. प्रवेश परीक्षा वेळेवर होतील, असे त्यांनी सांगितले.
चोवीस तासांत २,७५६ नवे रुग्ण
n पाकमध्ये मागील चोवीस तासांत कोरोनाचे २,७५६ नवे रुग्ण आढळले आहेत. याबरोबरच देशातील एकूण रुग्णांची संख्या ३,७६,९२९ झाली आहे. देशाच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, महामारीमुळे आणखी ३४ जणांचा मृत्यू झाला असून, एकूण मृतांची संख्या ७.६९६ वर गेली आहे.
n पाकमध्ये ३,३०,८८५ रुग्ण बरे झाले असून, १,६७७ रुग्णांची तब्येत गंभीर आहे. देशात सध्या ३८,३४८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.