कोरोनापेक्षा धोकादायक विषाणू येणार; इबोला शोधणाऱ्या संशोधकानं दिला धोक्याचा इशारा
By कुणाल गवाणकर | Published: December 24, 2020 09:30 AM2020-12-24T09:30:05+5:302020-12-24T09:31:34+5:30
कोरोनापेक्षा अधिक धोकादायक विषाणू आफ्रिकेच्या वर्षावनांमध्ये तयार होताहेत; डॉ. जीन यांनी सांगितला पुढचा धोका
नवी दिल्ली: जगातील कोरोना बाधितांचा आकडा ८ कोटींच्या जवळपास पोहोचला आहे. तर मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या १७ लाखांच्या पुढे गेली आहे. एका बाजूला काही देशांनी कोरोना संकट रोखण्यासाठी लसीकरण सुरू केलं असताना दुसरीकडे कोरोनाचे नवे आणि धोकादायक स्ट्रेन आढळून येत आहेत. कोरोनाचे नवे स्ट्रेन जास्त वेगानं पसरतात. त्यामुळे धोका वाढला असून संपूर्ण जग चिंतेत आहे.
कोरोनाचा आणखी एक नवा स्ट्रेन सापडला; जाणून घ्या धोका किती वाढला
एका बाजूला कोरोनाचं संकट कायम असताना आता इबोलाच्या विषाणूचा शोध लावणाऱ्या संशोधकानं धोक्याचा इशारा दिला आहे. भविष्यात येणारे विषाणू कोविड-१९ पेक्षा जास्त धोकादायक असतील, असं भाकीत प्राध्यापक डॉ. जीन-जॅक्स मुएम्बे ताम्फुम यांनी वर्तवलं आहे. डॉ. जीन यांनी १९७६ मध्ये इबोलाचा विषाणू शोधण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे त्यांनी वर्तवलेला अंदाज महत्त्वाचा आहे.
ब्रिटनसह अनेक भागात कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा हाहाकार; पुन्हा सक्तीच्या लॉकडाऊनमध्ये राहावं लागणार?
भविष्यात असंख्य प्रमाणात विषाणू येतील. यातले काही सध्याच्या कोविड-१९ पेक्षा जास्त धोकादायक असतील, असा दावा डॉ. जीन यांनी केला. या विषाणूंच्या निर्मितीची प्रक्रिया आफ्रिकेतल्या उष्णकटिबंधीय वर्षावनांमध्ये सुरू झाली आहे. आपण आता अशा जगात राहत आहोत, जिथे नवे नवे रोगकारक समोर येतील. मानवासाठी अतिशय धोकादायक असलेले विषाणू मोठ्या प्रमाणात आफ्रिकेच्या वर्षावनांमध्ये तयार होत आहेत. त्यांची संख्या अगणित आहे, असं जीन यांनी सांगितलं.
कोरोना संकटातच आता मानवी मेंदू खाणाऱ्या जीवाणूचा कहर; CDC चा सतर्कतेचा इशारा
इबोलाचा शोध घेण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या डॉ. जीन यांनी बाधितांच्या रक्ताचे नमुने गोळा केले होते. त्यासाठी ते आघाडीवर राहून काम करत होते. इबोला धोकादायक रोग असून तो रक्तस्रावास कारणीभूत ठरतो. या रोगाचा प्रसार सुरू होताच सुरुवातीला तब्बल ८८ टक्के रुग्णांचा मृत्यू झाला होता. याशिवाय ज्या रुग्णालयांमध्ये या रुग्णांवर उपचार सुरू होते, तिथले ८० टक्के कर्मचारी मृत्यूमुखी पडले होते. यम्बुकु मिशन रुग्णालयात इबोलाचा शोध लागला होता.