प्रशांत महासागराच्या तळाशी बनतोय इटली, फ्रान्स देशांपेक्षाही मोठा कच-याचा पट्टा
By vaibhav.desai | Published: August 2, 2017 02:36 PM2017-08-02T14:36:09+5:302017-08-02T14:54:35+5:30
प्रशांत महासागरात अमेरिकेतील टेक्सास या शहराहून मोठ्या आकाराचा प्लॅस्टिकचा पट्टा समुद्राच्या तळाशी तयार होत असल्याचा दावा अमेरिकेच्या संशोधकांनी केला आहे
कॅलिफोर्निया, दि. 2 - सागराच्या पोटात काय काय दडलंय, याची नेहमीच चर्चा होत असते. असं म्हणतात, सागराच्या पोटात खजिना दडलाय. मात्र अमेरिकेचे संशोधक चार्ल्स मूरे यांनी नवा शोध लावला आहे. प्रशांत महासागरात अमेरिकेतील टेक्सास या शहराहून मोठ्या आकाराचा प्लॅस्टिकचा पट्टा समुद्राच्या तळाशी तयार होत असल्याचा दावा अमेरिकेच्या संशोधकांनी केला आहे. प्रशांत महासागरात दिवसेंदिवस प्लॅस्टिकचा कचरा वाढतोय. प्लॅस्टिकमुळे महासागरातील प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढलंय. तसेच तयार होत असलेला प्लॅस्टिकच्या कच-याचा पट्टा नष्ट करणंही शक्य नसल्याचं मूरे म्हणाले आहेत.
अमेरिकेचे संशोधक मूरे आणि त्यांच्या टीमनं 6 महिने समुद्रात प्रवास करून याची माहिती मिळवली आहे. या समुद्र प्रवासादरम्यान समुद्राच्या तळाशी त्यांना प्लॅस्टिकचे तुकडे आढळले, त्या तुकड्यांची विल्हेवाट लावणंही शक्य नसल्याचंही मूरे यांनी सांगितले आहे. दहा वर्षांपूर्वी म्हणजेच 2007 रोजी सापडलेले प्लॅस्टिकच्या तुकडे आणि आताचे तुकडे यात साम्य आहे का, याचीही तपासणी सुरू असल्याची माहिती मुरे यांनी दिलीय. 1990पासून मूरे हे समुद्रातील प्लॅस्टिकच्या प्रदूषणाबाबत जनजागृती करतायत. आताच केलेल्या संशोधनानुसार प्रशांत महासागरात मोठ्या आकाराचा प्लॅस्टिकच्या कच-याचा पट्टा तयार होत असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं आहे. त्या प्लॅस्टिकच्या पट्ट्याचा आकार हा इटली, फ्रान्स देशांहून मोठा असून, टेक्सास शहराच्या 1.5 पट इतका आहे. समुद्राच्या तळाशी चक्रगतीनं हा प्लॅस्टिकच्या कचरा गोळा होत असून, त्याचा पट्टा हळूहळू तयार होत आहे. सर्वात आधी डॉ. मार्कस एरिक्सन यांच्या टीमनं याचा शोध घेतला होता. 2011मध्येही थोडा कच-याचा पट्टा तयार होत असल्याचं त्यांना दिसलं होतं, अशी माहिती डॉ. मार्कस यांनी इतर संशोधकांना दिली होती. याचाही खुलासा अमेरिकेचे संशोधक चार्ल्स मूरे यांनी केला आहे.
पृथ्वीचा तीन चतुर्थांश भाग पाण्याने व्यापलेला आहे. जेवढे जीव-जंतू जमिनीवर आहेत, त्याहीपेक्षा जास्त पाण्यात आहेत. जितके सौंदर्य जमिनीवर आहे, त्याच्या कैकपटीने ते पाण्यात आहे. त्यामुळे ते जपणं काळाची गरज आहे. समुद्रात मासेमारी करताना अनेकदा मच्छीमारांची जाळी खडकाला अडकून तुटतात. त्यातील काही भाग त्या खडकात तसाच राहतो. त्याप्रमाणेच समुद्रकिनारी आलेले पर्यटक प्लॅस्टिकच्या पिशव्या समुद्राच्या पाण्यात सोडतात. ते प्लॅस्टिक मासे खाऊन मृत पावतात आणि जैवविविधतेचे नुकसान होते.
सागरी प्रवाळ (कोरल्स)
समुद्रात अद्भुत रंगाच्या प्रवाळांची विलक्षण दुनिया आहे. प्रवाळ म्हणजे सागरी जिवांची वसाहत. हे जीव वाढत असताना, त्यांची पैदास होताना कॅल्शिअम कार्बोनेटची निर्मिती होते. यामुळेच प्रवाळांना नानाविध आकार निर्माण होतात. यांच्या सान्निध्यात किंवा वसाहतीत इतर अनेक जलचर आश्रय घेतात. उष्ण कटिबंधातील भागात भरपूर सूर्यप्रकाशाच्या ठिकाणी प्रवाळांची उत्तम पैदास होते. ऑस्ट्रेलियात मैलोन्मैल लांबीचे प्रवाळांचे पट्टे आहेत. असे पट्टे तयार होण्यास हजारो वर्षे लागतात. हे कोरल्स अत्यंत संवेदनशील असतात. बदलत्या वातावरणाचा किंवा पर्यावरणाचा त्यांच्या वाढीवर चटकन परिणाम होतो. समुद्रामध्ये सूर्याची किरणे ज्या भागापर्यंत थेट पोहोचतात आणि जेथील पाणी जास्त उथळ नसते, त्याठिकाणी सागरी प्रवाळाची निर्मिती होते. सागरी प्रवाळांमध्ये दरवर्षी एक सेंटिमीटरने वाढ होते.