कोरोना चाचणीसाठी शास्त्रज्ञांनी तयारी केली खास मायक्रोचिप; ५५ मिनिटांत रिझल्ट!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2021 07:39 PM2021-02-26T19:39:55+5:302021-02-26T19:40:45+5:30
मायक्रोचीपच्या सहाय्यानं अवघ्या ५५ मिनिटांच्या आत तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनवर कोरोना चाचणीचा रिझल्ट पाहता येणार आहे.
कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत असताना शास्त्रज्ञांच्या हाती एक मोठं यश आलं आहे. शास्त्रज्ञांनी तिकीटाच्या आकाराची एक खास चिप विकसीत केली आहे. यातून कोविड-१९ ची चाचणी केली सहजरित्या होणार आहे. मायक्रोचीपच्या सहाय्यानं अवघ्या ५५ मिनिटांच्या आत तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनवर कोरोना चाचणीचा रिझल्ट पाहता येणार आहे. (scientists develops microfluidic chip for instant covid 19 test)
अमेरिकास्थित राइस युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी विकसीत केलेल्या मायक्रोफ्लूइडिक चिपच्या माध्यमातून (Microfluidic Chip) तुमच्या हाताच्या बोटातून रक्ताचा नमुना घेण्यात येतो. त्यानंतर रक्ताचं विश्लेषण केलं जातं आणि कोविड-१९ ची लागण झालीय की नाही हे तपासण्यात येतं.
'एसीएस सेंसर्स' या रिसर्च मॅगझीनमध्ये छापण्यात आलेल्या माहितीनुसार मायक्रोचीपच्या मदतीनं बोटावर सुई टोचून रक्ताचा नमुना घेण्यात येतो. रक्तातील सार्स कोवि-२ न्यूक्लियोकॅप्सिड (एन) प्रोटीनच्या अंशाची मोजणी केली जाते. यामाध्यमातून कोविड-१९ विषाणूचा शरिरात शिरकाव झालाय की नाही हे लक्षात येतं.
वापरास अतिशय सोपी
आरटी-पीसीआर चाचणीच्या तुलनेत मायक्रोचिप चाचणी वापरास सोपी असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. या माध्यमातून तुम्हाला एकाच जागी संपूर्ण चाचणी प्रक्रिया करता येते. त्याचा वापर देखील सोपा आहे. यासाठी कोणत्याही प्रयोगशाळेची गरज भासत नाही. मायक्रोचिपच्या माध्यमातून जास्तीत जास्त ५५ मिनिटांच्या आत कोरोना चाचणीचा निकाल हाती येतो.