बापरे! एकाच वेळी व्यक्तीला झाला मंकीपॉक्स, कोरोना आणि HIVचा संसर्ग; शास्त्रज्ञही हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2022 05:14 PM2022-08-29T17:14:07+5:302022-08-29T17:15:25+5:30
एकाच व्यक्तीमध्ये तीन व्हायरस हे एकाच वेळी आढळले आहेत. शास्त्रज्ञ देखील या घटनेनंतर हैराण झाले आहेत.
वेगाने पसरणाऱ्या विविध व्हायरसमुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच आता एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इटलीतील एका व्यक्तीला एकाच वेळी मंकीपॉक्स, कोरोना व्हायरस आणि एचआयव्हीची लागण झाल्याचे आढळून आले आहे. असा दावा केला जात आहे की जगातील अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे, ज्यामध्ये एकाच व्यक्तीमध्ये तीन व्हायरस हे एकाच वेळी आढळले आहेत. शास्त्रज्ञ देखील या घटनेनंतर हैराण झाले आहेत.
कॅटेनिया विद्यापीठाच्या संशोधकांनी केलेला हा अभ्यास जर्नल ऑफ इन्फेक्शनमध्ये प्रकाशित झाला आहे. त्यानुसार, 36 वर्षीय व्यक्ती काही दिवसांपूर्वी स्पेनमध्ये गेला होता. तेथे 16 ते 20 जूनपर्यंत मुक्काम केला. तो परत आला तेव्हा त्याला आरोग्याविषयक अनेक समस्या होत्या. प्रवासातून परतल्यानंतर नऊ दिवसांनी ताप, घसा दुखणे, डोकेदुखी अशी लक्षणे दिसून आली. कोरोना चाचणी केली असता चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. तीन दिवसांनंतर त्याच्या हातात पुरळ दिसू लागली आणि हळूहळू ती शरीरभर पसरली. त्यामुळे त्यांची प्रकृती अधिकच गंभीर झाली.
डॉक्टरांनी त्यांना तात्काळ कॅटानिया शहरातील रुग्णालयात दाखल केले आणि आयसीयूमध्ये नेऊन उपचार सुरू करण्यात आले. येथील चाचण्यांमध्ये त्याला मंकीपॉक्स आणि एचआयव्हीची लागण झाल्याची पुष्टी झाली. काही दिवसांपूर्वी त्या व्यक्तीला एचआयव्हीची लागण झाल्याचेही कळले. मात्र 11 जुलैपर्यंत रुग्णाच्या शरीरावरील मंकीपॉक्सचे पुरळ गेले आणि त्याचा कोरोना रिपोर्टही निगेटिव्ह आला. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता, परंतु त्यांना काही दिवस वेगळे राहण्याचा सल्ला देण्यात आला होता.
शास्त्रज्ञांच्या मते, एचआयव्ही एड्समुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती नष्ट होते. त्यामुळे इतर आजार होण्याचा धोका अनेक पटींनी वाढतो. यामधेच जर कोरोना व्हायरस आणि मंकीपॉक्सचा संसर्ग झाला तर समस्या आणखी वाढतात. मंकीपॉक्सची लक्षणे बर्याच लोकांमध्ये दिसत नाहीत परंतु ती एचआयव्ही असलेल्या व्यक्तीला सहजपणे संक्रमित करू शकते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.