एच-१ बी व्हिसावर सिनेटर्सचे टीकास्त्र
By admin | Published: February 27, 2016 01:55 AM2016-02-27T01:55:25+5:302016-02-27T01:55:25+5:30
येथे लोकप्रिय असलेल्या एच-१ बी व्हिसा कार्यक्रमावर वरिष्ठ अमेरिकी सिनेटर्सनी टीका केली आहे. अमेरिकी कर्मचाऱ्यांना काढून भारतासह अन्य देशांचे कर्मचारी कमी वेतनात
वॉशिंग्टन : येथे लोकप्रिय असलेल्या एच-१ बी व्हिसा कार्यक्रमावर वरिष्ठ अमेरिकी सिनेटर्सनी टीका केली आहे. अमेरिकी कर्मचाऱ्यांना काढून भारतासह अन्य देशांचे कर्मचारी कमी वेतनात ठेवण्यासाठी या व्हिसाचा दुरुपयोग करणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
यासंदर्भातील समितीचे प्रमुख सिनेटर जेफ सेशन्स म्हणाले की, अमेरिकेत कुशल कामगारांची टंचाई आहे, ही खेदाची बाब आहे. अमेरिकेत अमेरिकी कर्मचाऱ्यांना कमी करून त्यांच्या जागेवर परदेशातील कर्मचारी ठेवले जात आहेत, ही धक्कादायक बाब आहे. अमेरिकेत कुशल कर्मचाऱ्यांची वानवा असल्याचा आरोप अनेक कंपन्या करीत असतात. त्यांचा हा आरोप फेटाळून लावताना जेफ सेशन्स म्हणाले की, कमी वेतनात परदेशी कर्मचारी ठेवण्यासाठी कंपन्यांतर्फे हा दावा केला जात आहे. कुशल अमेरिकन कर्मचाऱ्यांची टंचाई नसल्याची आकडेवारी दर्शविते. त्याचबरोबर विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित या विषयातील पदवीधरांचीही कमतरता नाही. या पदव्या घेणारे युवक दरवर्षी येथील शिक्षण संस्थांतून बाहेर पडत असतात.
अन्य एक सिनेटर पॅट्रिक लेही म्हणाले की, या एच-१ बी व्हिसाचा उपयोग अमेरिकी कर्मचाऱ्यांसाठी केला पाहिजे. त्यांना कामावरून कमी करण्यासाठी नाही.