गो-या पोलिसावर स्कॉटच्या खुनाचा गुन्हा
By Admin | Published: April 9, 2015 12:41 AM2015-04-09T00:41:15+5:302015-04-09T00:41:15+5:30
गोरा पोलीस अधिकारी मायकेल थॉमस स्लेगर याच्यावर वॉल्टर स्कॉट (५०) या कृष्णवर्णीयाला गोळ्या घालून ठार मारल्याचा गुन्हा मंगळवारी दाखल झाला
चार्लस्टन : गोरा पोलीस अधिकारी मायकेल थॉमस स्लेगर याच्यावर वॉल्टर स्कॉट (५०) या कृष्णवर्णीयाला गोळ्या घालून ठार मारल्याचा गुन्हा मंगळवारी दाखल झाला. या हत्येच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी दक्षिण कॅरोलिनामध्ये बुधवारी निदर्शने केली. या हत्येचे चित्रीकरण कोणी तरी केले आणि ते जाहीर झाल्यावर कृष्णवर्णीय समाजात संतापाची लाट निर्माण झाली.
वॉल्टर स्कॉटच्या वाहनाच्या लाईट ब्रेकमध्ये दोष होता, त्यामुळे त्याला थांबण्यास सांगण्यात आले होते; परंतु तो न थांबता पळून जाऊ लागला. त्यानंतर स्लेगरने त्याच्यावर आठ गोळ्या झाडल्या. स्लेगर याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती नॉर्थ कॅरोलिनाचे महापौर केथ सुमे यांनी दिली. फेडरल ब्युरो आॅफ इन्व्हेस्टिगेशन (एफबीआय) आणि अमेरिकेचा न्याय विभाग या गोळीबाराची चौकशी करीत आहे. यापूर्वीही गोऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी दोन कृष्णवर्णीयांना ठार मारल्याची घटना घडली आहे. ताज्या हत्येमुळे अमेरिकेचे पोलीस आणि कृष्णवर्णीयांचे संबंध हा प्रश्न पुन्हा समोर आला आहे. नागरी हक्क नेत्यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले असून या हत्येचे चित्रीकरण ज्या कोणी धाडसाने केले व ते मृताच्या कुटुंबियांना दिले त्याचे मोठे कौतुक नागरिकांतून होत आहे. ‘ते चित्रीकरण मी बघितले तेव्हा मी मटकन खाली बसलो आणि माझे हृदय भंगले’, असे स्कॉटचे वडील वॉल्टर स्कॉट (सिनियर) यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)