समुद्रातून किंचाळण्याचा आवाज, बेपत्ता पाणबुडीतील अब्जाधिशांकडे काही तासांचाच ऑक्सिजन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2023 07:48 AM2023-06-22T07:48:37+5:302023-06-22T07:49:17+5:30
टायटॅनिकचे अवशेष दाखविण्यासाठी निघालेली ही पाणबुडी रविवारी बेपत्ता झाली होती
न्यूयॉर्क : जगातील सर्वात लोकप्रिय जहाज टायटॅनिकचे अवशेष दाखवण्यासाठी अटलांटिक महासागरात गेलेली पाणबुडी अजूनही बेपत्ता आहे. कॅनडाच्या पी-३ विमानाने शोधमोहीम ज्या भागात चालविली जात आहे तेथे पाण्याखाली लोकांचा किंचाळण्याचा आवाज समोर आला आहे. या प्रकारानंतर त्या भागात अतिरिक्त सोनार यंत्र तैनात करण्यात आले. पाणबुडी शोधण्यात गुंतलेल्या सरकारी यंत्रणांचा दावा आहे की पाणबुडीतील ऑक्सिजन गुरुवारी संपणार आहे. यामुळे पाणबुडीत असलेल्या अब्जाधीशांच्या नातेवाइकांची काळजी वाढली आहे.
टायटॅनिकचे अवशेष दाखविण्यासाठी निघालेली ही पाणबुडी रविवारी बेपत्ता झाली होती. तेव्हापासून या पाणबुडीचा शोध घेण्यात येत आहे. या पाणबुडीत पाकिस्तानी अब्जाधीश प्रिन्स दाऊद, त्याचा मुलगा सुलेमान, ब्रिटिश उद्योगपती हमिश हार्डिंग यांच्यासह पाचजण आहेत. ही पाणबुडी चालवणारी कंपनी ओशनगेटचे सीईओ स्टॉकटन रश आणि फ्रेंच संशोधक पॉल आनरी नार्जेलेट हेदेखील या पाणबुडीत आहेत.
शंभर वर्षं उलटून गेली, तरी टायटॅनिकचे अवशेष समुद्र तळाशी आहेत. आपल्या पहिल्याच प्रवासात हिमनगाला धडकून बुडालेले हे त्या काळातलं सर्वांत मोठं जहाज होते.
शोधमोहिमेत आंतरराष्ट्रीय संस्था
पाणबुडी शोधण्यात आंतरराष्ट्रीय संस्थाही सहभागी झाल्या आहेत. अमेरिकेच्या कोस्ट गार्डच्या प्रवक्त्याने म्हटले आहे की, बचाव कार्य अत्यंत गुंतागुंतीचे आहे आणि जर पाणबुडीचे स्थान माहीत असेल तर त्याला वाचवण्यासाठी आम्ही ताकदीने शक्य तितके प्रयत्न करू.
१०,००० चौरस किमीमध्ये शोध
टायटॅनिकचे अवशेष कॅनडाच्या न्यूफाउंडलँडच्या सेंट जॉन्सपासून दक्षिणेस ७०० किमी अंतरावर आहे. अमेरिकेच्या बोस्टनमधून ही बचाव आणि शोधमोहीम सुरू आहे. कोस्ट गार्डने सांगितले की, १० हजार चौरस किलोमीटरचा शोध घेतला आहे. या शोधमोहिमेत रोबोचाही वापर करण्यात येत आहे.
त्याने शंका व्यक्त केली अन् नोकरी गेली
२०१८ मध्ये या उद्योगातील तज्ज्ञांनी ओशनगेट कंपनीच्या टायटन पाणबुडीबद्दल चिंता व्यक्त केली होती आणि कंपनीच्या सीईओला पत्र लिहिले होते. ज्या तज्ज्ञाने २०१८ पाणबुडी सुरक्षिततेच्या समस्यांबाबत चिंता व्यक्त केली होती त्याला ओशनगेटने काढून टाकले होते.