गुरूत्वीय लहरींबरोबर गॅमा किरणांचाही शोध, भारतीय शास्त्रज्ञांचे महत्त्वपूर्ण योगदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 11:45 PM2017-10-16T23:45:34+5:302017-10-16T23:58:37+5:30
दोन न्युट्रॉन ता-यांच्या धडकेतून उत्पन्न झालेल्या गुरूत्वीय लहरी व त्यातून बाहेर पडणा-या गॅमा किरणांचा (प्रकाश किरण) एकाचवेळी शोध घेण्यात खगोलशास्त्रज्ञांना पहिल्यांदाच यश मिळाले आहे.
- राजानंद मोरे
पुणे : दोन न्युट्रॉन ता-यांच्या धडकेतून उत्पन्न झालेल्या गुरूत्वीय लहरी व त्यातून बाहेर पडणा-या गॅमा किरणांचा (प्रकाश किरण) एकाचवेळी शोध घेण्यात खगोलशास्त्रज्ञांना पहिल्यांदाच यश मिळाले आहे. दोन न्युट्रॉन ता-यांची ही पहिलीवहिली धडक टिपता आल्याने गुरूत्वलहरी या निर्वात पोकळीत प्रकाशाच्या वेगाने प्रवास करतात, या आईनस्टाईन यांच्या भाकितालाही भक्कम पुरावा मिळाला आहे. या शोधामध्ये भारतीय खगोलशास्त्रज्ञांचेही महत्वपुर्ण योगदान आहे.
अमेरिकेतील लायगो आणि युरोपमधील व्हर्गो या दोन वेधशाळांनी दि. १७ आॅगस्ट रोजी न्युट्रॉन ता-यांची धडक टिपली आहे. अमेरिकेतील नॅशनल सायन्स फाऊंडेशनने सोमवारी पत्रकार परिषदेत या संशोधनाची घोषणा केली. पुण्यातील ‘आयुका’ येथे खगोलशास्त्रज्ञांच्या उपस्थितीत याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले.
दोन न्युट्रॉन ता-यांच्या धडकेची घटना आपल्यापासून केवळ १३ कोटी प्रकाशवर्ष दुर घडल्यामुळे गुरूत्वलहरींचे आतापर्यंतचे सर्वात ठळक निरीक्षण नोंदविले गेले आहे. यापुर्वी चार वेळा गुरूत्वीय लहरींचा शोध लागला असला तरी त्या आपल्यापासून खुप दुर अंतरावर होत्या. ही घटना पहिल्यांदाच पृथ्वीपासून इतक्या जवळ घडल्याने गॅमा किरणांचा शोध लावण्यात यश मिळाले आहे. ता-यांच्या धडकेमुळे घडलेल्या विस्फोटातून गॅमा किरणांचा झगमगाट बाहेर पडला. या किरणांचा विस्फोट उपग्रहस्थित विविध दुर्बिणींनी गुरूत्वलहरींच्या निरीक्षणानंतर केवळ दोन सेकंदांच्या फरकाने टिपला आहे. यामुळे दोन न्युट्रॉन ता-यांच्या धडकेमुळे गॅमा किरणे दिसतात या अनेक वर्ष जुन्या सिध्दांताला पुष्टी मिळाली आहे.
न्युट्रॉन तारा...
मोठ्या ता-यांच्या विस्फोटातून शिल्लक राहिलेला गाभा म्हणजे न्युट्रॉन तारा. हे न्युट्रॉन तारे आकाराने लहान आणि सर्वाधिक घनतेचे असतात. सुर्याच्या जवळजवळ दीड पट वस्तुमानाच्या न्युट्रॉन ता-याचा व्यास अंदाजे दोन किलोमीटर असतो. म्हणजे एका छोट्या चमचाभर अशा ता-याच्या तुकड्याचे वस्तुमान अख्ख़्या सह्याद्री पर्वत, पश्चिम घाट यापेक्षाही अधिक भरेल. एकमेकांभोवती फिरत, जवळ येत आणि अखेर विलीन होण्याच्या प्रक्रियेचा अखेरचा साधारण १०० सेकंदांचा दोन न्युट्रॉन ता-यांचा प्रवास शास्त्रज्ञांना गुरूत्व लहरींच्या माध्यमातून टिपता आला.
भारतीय शास्त्रज्ञांचा सहभाग...
गुरूत्वीय लहरी व गॅमा किरणांच्या शोधामध्ये पुण्यातील आयुका व आयसरसह भारतातील १३ वेगवेगळ्या संशोधन संस्थांमधील ४० संशोधकांचा सहभाग आहे. आयुकातील अनिबॉण आई, सुकांत बोस, संजीव धुरंधर, भूषण गद्रे, शरद गावकर, संजीत मित्रा, निखिल मुकूंद, अभिषेक परिदा, जयंती प्रसाद, तरूण सौरदीप आणि जिष्णू सुरेश या ११ जणांचा यामध्ये सहभाग आहे. गुरुत्वाकर्षण तरंगांच्या शोधयंत्राशी होणा-या प्रतिक्रियेचे आकलन, जमिनीवरील हालचालींचा शोधयंत्रावर होणारा परिणाम, गुरूत्वाकर्षणीय तरंगाच्या शोधासाठी माहितीचे विश्लेषण पध्दतींचा शोध, न्युट्रॉन ताºयाच्या विविध गुणधर्णांचा अभ्यास अशा विविध बाबतीत त्यांना मोलाचे काम केले आहे. या विस्फोटाच्या विद्युतचुंबकीय दुर्बिणीच्या साहाय्याने निरीक्षण करण्यामध्ये दीपंकार भट्टाचार्य, जावेद राणा, गुलाब दिवंगण, अजय विभुते आणि रुपक रॉय यांचा समावेश आहे.
खजिन्याचा शोध
एकाचवेळी गुरूत्वीय लहरी व गॅमा किरणांची नोंद झाल्याने हा शोध खुप महत्वपुर्ण असल्याचे खगोलशास्त्रज्ञांनी सांगितले. यामुळे या ताºयांची जडणघडण आपल्याला कळू शकेल. तसेच आपल्या विश्वाचे प्रसारण मोजण्याचा एक नवा व स्वतंत्र मार्गही उपलब्ध झाला आहे. तसेच या शोधामुळे नवीन जड मुलद्रव्य निर्मितीचे पुरावेही मिळाले आहेत. यातून अशा अवकाशीय टकरी म्हणजे लोखंडापेक्षा जड मुल्यद्रव्ये निर्मितीचे नैसर्गिक कारखानेच असल्याचे सिध्द झाले आहे. यामध्ये सोन्यासह प्लॅटिनम या मुलद्रव्यांचाही समावेश आहे.