पृथ्वीवरील सर्वांत जुन्या जीवाश्मांचा शोध
By admin | Published: March 3, 2017 04:47 AM2017-03-03T04:47:28+5:302017-03-03T04:47:28+5:30
वैज्ञानिकांनी पृथ्वीवरील सर्वात जुन्या जीवाश्मांचा शोध लावला आहे.
टोरंटो : वैज्ञानिकांनी पृथ्वीवरील सर्वात जुन्या जीवाश्मांचा शोध लावला आहे. कॅनडात शोधलेले सूक्ष्मजीवांचे हे अवशेष ३.८ ते ४.३ अब्ज वर्षांपूर्वीचे असल्याचा दावा करण्यात येत आहे. या अवशेषात सूक्ष्म तंतू आणि ट्यूब्स आहेत. कॅनडातील क्विबेक शहरात एका चमकणाऱ्या दगडात हे अवशेष आढळून आले आहेत. हे सूक्ष्म जीव लोखंडावर राहत होते. असे जीव ३७७० दशलक्ष वर्षांपूर्वी आढळत होते, असे संशोधकांनी सांगितले. समुद्राच्या हायड्रोथर्मल सिस्टीममध्ये हे जीव राहत होते. ही समुद्रातील अशी जागा आहे जिथे ज्वालीमुखीच्या हालचाली कमी होतात. या भागातील गरम पाण्यामुळे हे जीव येथे वाढले असावेत, असाही दावा करण्यात येत आहे. यूनिव्हर्सिटी कॉलेज आॅफ लंडनचे या टीममधील एक सदस्य मॅथ्यू डोड यांनी सांगितले की, पृथ्वीच्या निर्मितीनंतर काही काळातच समुद्रात या जिवांची निर्मिती झाली. ज्यावेळी हे जीव पृथ्वीवर होते तेव्हा मंगळावर पाणी होते, असा दावाही यात करण्यात आला आहे. पृथ्वीवरील हे सर्वात जुने जीव असल्याचे संशोधकांचे म्हणणे असून विश्वात इतरत्र जीवनाच्या खुणा शोधण्यासही याचा उपयोग होईल, असा दावा केला जात आहे.