हा दुसरा मुक्तीसंग्राम, आम्ही मुक्त झालो; नोबेल विजेते मोहम्मद यूनुस यांची शेख हसीनांवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2024 12:34 PM2024-08-06T12:34:58+5:302024-08-06T12:36:12+5:30
यूनुस यांनी नेहमीच शेख हसीनांवर टीका केलेली आहे. हसीना यांनी देखील यूनुस हे ग्रामीण बँकांद्वारे गरिबांना लुटत असल्याचे म्हणत १९० गुन्हे दाखल केले होते.
बांगलादेशमध्ये अंतरिम सरकार बनविण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. पत्रकार, उद्योगपती, अर्थशास्त्री, राजकारणी व सैन्य असे मिळून सरकार चालविणार आहेत. अशातच या सरकारचे मुख्य सल्लागार असलेले व पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये आघाडीवर असलेल्या नोबेल पुरस्कार विजेत्या डॉ. मोहम्मद यूनुस यांनी धक्कादायक वक्तव्य केले आहे.
यूनुस यांनी नेहमीच शेख हसीनांवर टीका केलेली आहे. आता त्यांनी हसीना देश सोडून गेल्यावर द प्रिंटला मुलाखत दिली आहे, यात विद्यार्थ्यांचे आंदोलन हे बांगलादेशचा दुसरा मुक्तीसंग्राम होता, असे म्हटले आहे. तसेच हसीना देश सोडून गेल्याने आम्ही मुक्त झालो आहोत. आम्ही एक स्वतंत्र देश आहोत. जोवर त्या इथे होत्या आम्ही त्यांच्या ताब्यात होतो. त्या एक कब्जा करणारी शक्ती, एक हुकुमशहा, एक सेनापती सारखे वागत होत्या. ती सर्व काही नियंत्रणात ठेवत होती, असे यूनुस यांनी म्हटले आहे.
यूनुस यांनी बांगलादेशमध्ये सहकार चळवळ राबविली होती. ग्रामीण बँकेची स्थापना करत गरीबांना लघु उद्योग सुरु करण्यासाठी कर्ज उपलब्ध केले होते. यामुळे त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला होता. या धर्तीवर जगभरातील देशांनी आपापल्या गावांमध्ये बँका उघडून गरीबांना आर्थिक मदत केली होती. यूनुस यांनी गरीबांचे रक्त शोषल्याचा आरोप शेख हसीनांनी केला होता. या ग्रामीण बँका गरीबांकडून भरमसाठ व्याज वसूल करतात, असा आरोप केला होता. हसीना यांच्या सरकारने यूनुस यांच्यावर १९० गुन्हे दाखल केले होते. त्यांच्यावर एक भ्रष्टाचाराचा अभियोगही सुरु झाला होता.
चारवेळा सलग सत्तेत आलेल्या हसीना यांना यूनुस यांनी हुकुमशहा म्हटले आहे. हसीना यांनी बांगलादेशचे राष्ट्रपिता शेख मुजीबुर्रहमान यांची प्रतिमा बरबाद केल्याचा आरोप यूनुस यांनी केला आहे. याचबरोबर बांगलादेशातील हिंसाचार योग्य असल्याचे यूनुस म्हणाले. देशात जी हिंसा, तोडफोड होत आहे तो हसीना यांच्याविरोधातील लोकांमधील राग आहे. हेच विद्यार्थी देशाला योग्य दिशेने नेतील, असे ते म्हणाले.