युरोपमध्ये कोरोनाची दुसरी लाट, फ्रान्समध्ये 24 तासांत 1 लाख रुग्ण
By महेश गलांडे | Published: October 27, 2020 06:08 PM2020-10-27T18:08:24+5:302020-10-27T18:09:25+5:30
कोरोना संसर्गाच्या नव्या लाटेवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्पेनने आता रात्रीच्यावेळी कर्फ्यू लागू केला आहे. तसेच, देशात आणीबाणी घोषित केली आहे. स्पेनचे पंतप्रधान पेद्रो सान्चेझ यांनी सांगितले की, सकाळी ११ वाजता ते सकाळी ६ वाजेपर्यंत कर्फ्यू लागू राहील
वाशिंग्टन - कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. अनेक प्रगत देश कोरोना व्हायरसपुढे हतबल झाले आहेत. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाने जगभरात थैमान घातले असून रुग्णांच्या संख्येने तब्बल चार कोटींचा टप्पा पार केला आहे. आता, कोरोनाची दुसरी लाट आल्याचं सांगण्यात येत आहे. फ्रान्समध्ये दिवसाला कोरोनाचे तब्बल 1 लाख रुग्ण आढळून येतील, अशी भीती फ्रान्स सरकारला सल्ला देण्याऱ्या वैद्यकीय समितीचे प्रोफेसर जीन फ्रॉन्सोईस यांनी म्हटलंय. फ्रान्सोईस यांनी आरटीएल रेडिओला बोलताना ही माहिती दिली.
कोरोना संसर्गाच्या नव्या लाटेवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्पेनने आता रात्रीच्यावेळी कर्फ्यू लागू केला आहे. तसेच, देशात आणीबाणी घोषित केली आहे. स्पेनचे पंतप्रधान पेद्रो सान्चेझ यांनी सांगितले की, सकाळी ११ वाजता ते सकाळी ६ वाजेपर्यंत कर्फ्यू लागू राहील. म्हणजेच या कालावधीत लोकांना घराबाहेर पडायला बंदी असेल. हे निर्बंध रविवारपासून अंमलात आले आहेत. दुसरीकडे, कोरोना प्रकरणात होणारी वाढ पाहता श्रीलंकेने सर्वाधिक गर्दी असलेल्या १६ प्रवासी रेल्वे गाड्याही थांबविल्या आहेत. आता, फ्रान्सकडूनही देशात पुन्हा लॉकडाऊन करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यासंदर्भात नियमावली बनविण्यात येत आहे.
फ्रान्सच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवाडीनुसार 25 ऑक्टोबर रोजी देशात गेल्या 24 तासांत तब्बल 52,010 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे फ्रान्समधील रुग्णांची संख्या तब्बल 11.38 लाखांवर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत फ्रान्समध्ये तब्बल 116 जणांचा मृत्यू झाला असून देशातील मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 34,761 वर पोहोचली आहे.
चीनमध्येही कोरोना तोंड वर काढतोय
दरम्यान, जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 43,824,996 वर पोहोचली आहे. जगभरात कोरोनामुळे आतापर्यंत 1,165,289 लोकांना आपला जीव गमवाव लागला आहे. तर आतापर्यंत 32,206,606 जणांनी कोरोनाची लढाई जिंकली असून उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. चीनच्या वुहानमधून कोरोनाचा प्रसार झाल्याचं म्हटलं गेलं. त्यानंतर कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात चीनला बऱ्यापैकी यश आलं. मात्र, आता पुन्हा एकदा चीनमध्ये कोरोनाचं संकट आलं आहे. चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार होत असल्याची माहिती समोर आली आहे. चीनमधील एका मोठ्या शहरामध्ये तब्बल 50 लाख नागरिकांच्या कोरोना चाचण्या करण्यात येणार आहेत. पुन्हा एकदा या संपूर्ण भागामध्ये लॉकडाऊन लागू करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.