काश्मीर हा आमचा अंतर्गत प्रश्न, भारताने पाकिस्तानला पुन्हा एकदा ठणकावले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2019 09:24 PM2019-09-10T21:24:14+5:302019-09-10T21:25:48+5:30
काश्मीर प्रश्नावरून यूएनएचआरसीसमोर रडगाणे गाणाऱ्या पाकिस्तानचा खोटारडेपणा भारताने उघडा पाडला आहे.
जिनिव्हा - काश्मीर प्रश्नावरून यूएनएचआरसीसमोर रडगाणे गाणाऱ्या पाकिस्तानचा खोटारडेपणा भारताने उघडा पाडला आहे. तसेचा काश्मीर हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे आणि कलम 370 बाबतचा निर्णय हा जनभावनेचा विचार करून घेतला आहे, असे भारताने पाकिस्तानसह जगाला ठणकावून सांगितले आहे. तसेच दहशतवादाचे केंद्र असलेल्या पाकिस्तानला खोट्या कहाण्या सांगायची सवय झाली आहे, असा टोलाही भारताने यावेळी लगावला.
पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेसमोर (यूएनएचआरसी) काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला होता. तसेच काश्मीरमध्ये भारताकडून मानवाधिकारांचे उल्लंघन होत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. त्याला भारताकडून परराष्ट्र मंत्रालयातील सचिव विजय ठाकूर सिंह यांनी प्रत्युत्तर दिले. काश्मीरमधील परिस्थिती हळुहळू सामान्य होत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
विजय सिंह ठाकूर म्हणाल्या की, ''आमची राज्य घटना कुठलाही भेदभाव न करता सर्व नागरिकांना समान हक्क देते. आमची स्वतंत्र न्यायपालिका, मुक्त प्रसारमाध्यमे आणि आमचा समाज मानवाधिकारांचे रक्षण करतो. कलम 370 बाबत आम्ही हल्लीच घेतलेल्या निर्णयामुळे जम्मू काश्मीरमधील रहिवाशांना प्रत्येक नागरिकाप्रमाणे समान हक्क मिळतील. या निर्णयामुळे लिंगभेद कमी होईल तसेच लहान मुलांनाही योग्य ते अधिकार मिळतील.''
Secretary (East) MEA at UNHRC: As a result of recent legislative measures progressive policies will now be fully applicable to our citizens in J&K, & Ladakh.These will end gender discrimination,better protect juvenile rights&make applicable rights to education, information,& work pic.twitter.com/MBrtB3J5dl
— ANI (@ANI) September 10, 2019
काश्मीरवरून खोटारडेपणा करणाऱ्या पाकिस्तानलाही विजय सिंह ठाकूर यांनी यावेळी खडेबोल सुनावले. ''काश्मीरबाबतच्या खोट्या कहाण्या जागतिक दहशतवादाचे केंद्र बनलेल्या ठिकाणाहून येतात, हे जगाला माहिती आहे. या ठिकाणी दहशतवादाला आश्रय दिला जातो. तसेच संसदेकडून पारित करण्यात येणाऱ्या अन्य कायद्यांप्रमाणे काश्मीरबाबत घेण्यात आलेला निर्णयसुद्धा आमचा अंतर्गत प्रश्न आहे, याचा आम्ही पुनरुच्चार करू इच्छितो.''असेही त्यांनी ठणकावले.
Secretary (East) MEA: 1 delegation has given a running commentary with offensive rhetoric of false allegations&concocted charges against my country. World is aware that this fabricated narrative comes from epicentre of global terrorism,where ring leaders were sheltered for years. https://t.co/uU7ayacg2w
— ANI (@ANI) September 10, 2019
गेल्या काही दिवसांपासून जम्मू काश्मीरबाबत भारताने घेतलेल्या आक्रमक निर्णयामुळे पाकिस्तानची पुरती कोंडी झाली आहे. दरम्यान, आज पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेसमोर काश्मीर प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेसमोर (यूएनएचआरसी) काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला आहे. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मोहम्मद कुरेशी यांनी काश्मीरमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या प्रस्तावांचे उल्लंघन केले जात असल्याचा आरोप केला. यूएनएचआरसीने काश्मीरमधील मानवाधिकारांच्या हननाकडे लक्ष द्यावे, असे सांगत त्यांनी याप्रकरणी संयुक्त तपास समिती स्थापन करण्याची मागणी केली.
यूएनएचआरसीने काश्मीरच्या मुद्द्यावरून मौन बाळगू नये. भारताने काश्मिरींना दिलेला विशेष दर्जा संपुष्टात आणला आहे. काश्मीर हे मानवाधिकारांची दफनभूमी बनली आहे, असा आरोपही पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मोहम्मद कुरेशी यांनी केला.